भरावामुळे नेरळ कळंब रस्ता पाण्यात
By admin | Published: June 26, 2017 01:37 AM2017-06-26T01:37:09+5:302017-06-26T01:37:09+5:30
शहराला पडलेला बिल्डरचा विळखा येथील नागरी सुविधांच्या मुळावर येत असून, कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत एका बिल्डरने इमारतीसाठी केलेल्या मातीच्या
कांता हाबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : शहराला पडलेला बिल्डरचा विळखा येथील नागरी सुविधांच्या मुळावर येत असून, कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत एका बिल्डरने इमारतीसाठी केलेल्या मातीच्या भरावामुळे दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसात नेरळ-कळंब रस्ता पाण्याखाली आला आहे. नेरळकडून मुरबाड, नाशिक, नगरला जोडणारा हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे. या रस्त्यावरील धामोते गावाजवळील रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला होता. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. पावसामुळे रस्ता खचला तर अनेक गावांचा संपर्क तुटू शकतो, स्थानिक ग्रामपंचायत आणि बांधकाम विभाग या बिल्डरवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डांबरीकरणासाठी नुकतेच या ठिकाणी लाखो रु पये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, जागोजागी उभ्या राहत असलेल्या इमारतींमुळे पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाल्याने पाणी रस्त्यावर आले आहे. यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नेरळ परिसरात कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात निवासी संकुलांचे काम सुरू आहे. ग्रामपंचायत आणि बिल्डरांचे असलेले अर्थपूर्ण संबंध यामुळे बिल्डरांच्या चुकांकडे दुर्लक्षच करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नेरळ परिसरात अशी स्थिती अनेक ठिकाणी असून, याचा भुर्दंड पुन्हा शासनाला सोसावा लागत असल्याने सार्वजनिक हितास बाधक ठरणाऱ्या बिल्डरांवर कारवाईची मागणी वाहनचालक, प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे.