शहापूर तालुक्यातील गाव-पाड्यांत पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:45 AM2019-01-29T00:45:15+5:302019-01-29T00:45:32+5:30
जानेवारीतच गंभीर परिस्थिती; तहसीलदारांकडे टँकर मागणीचे प्रस्ताव सादर
भातसानगर : शहापूर तालुक्यातील चार गावे आणि आठ पाड्यांत आतापासूनच पाणीटंचाई भेडसावते आहे. या गाव पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यापासूनच पावसाने दिलेल्या गुंगाºयाचे पडसाद सध्या तालुक्यात जाणवत आहेत.
मार्च ते एप्रिल महिन्यात तालुक्यातील गावांना पाणीटंचाई जाणवत असे. यंदा मात्र, काही दिवसांपासूनच दांड,अजनुप, वाशाळा(बु), वाशाळा(खु), या चार गावांच्या बरोबर पारधवाडी, नारळवाडी, नवीनवाडी, कोळीपाडा, वरचा गायदरा, सखाराम पाडा, राईची वाडी, चारण वाडी, या गावांमध्ये काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. या गावांना तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी त्या-त्या ग्रामपंचायतीने गट विकास अधिकाºयांकडे लेखी मागणी केली आहे.
ही मागणी लक्षात घेत गट विकास अधिकारी टी.ओ. चव्हाण यांनी हे प्रस्ताव तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांच्याकडे पाठवल्याची माहिती दिली आहे. या गावपाड्यांना तीन टँकरची गरज असल्याने आता त्यासाठीची तरतूद केव्हा होते या प्रतीक्षेत नागरिक आहेत. या वर्षी तालुक्यात गेल्यावर्षीपेक्षा अधिक भीषण पाणी टंचाई निर्माण होणार असल्याचे संकेत आहेत. गेल्यावर्षी तालुक्यात ११२ गाव पाड्यांमध्ये पाणी टंचाई जाणवली होती. यंदा मात्र हा आकडा वाढणार आहे.
तानसा वैतरणा परिसरातील गावांना भातसा नदीतूनच पाणी मिळणार की, तानसा वैतरणा नदीतून या बाबत अजूनही काहीच माहिती नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. तानसा, वैतरणा या परिसरातील गावांना या धरणातून पाणी भरून दिल्यास त्यासाठीचे ३० किमी. अंतर वाचून गावांना लवकर आणि सुरळीत पाणीपुरवठा केला जाऊ शकेल, असे अनेकांचे म्हणणे आहे.
शहापूर तालुक्यातील तीन गावे आणि आठ पाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्या गावातील ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यानुसार त्या गाव पाड्यांना पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
- रवींद्र बाविस्कर,
तहसीलदार, शहापूर