केडीएमसीतील २७ गावांचा पाणीप्रश्न उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:41 AM2021-04-07T04:41:38+5:302021-04-07T04:41:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : केडीएमसी हद्दीतील २७ गावांमध्ये सध्या पाणीप्रश्न बिकट झाला आहे. त्याचबरोबर, कचरा, खड्डेमय रस्ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसी हद्दीतील २७ गावांमध्ये सध्या पाणीप्रश्न बिकट झाला आहे. त्याचबरोबर, कचरा, खड्डेमय रस्ते यासह अन्य नागरी समस्या निर्माण झाल्या असून, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी केडीएमसीचे माजी स्थायी समिती सदस्य व माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी लवकरात लवकर निर्णय घेऊन नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.
आजवर केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील नागरिकांना फक्त आश्वासने देण्यात आली. मात्र, त्याची पूर्तता अजूनही झाली नसल्याने नागरिक संतापले आहेत. सध्या ऐन उन्हाळ्यात नागरिकांना प्रचंड प्रमाणात पाणीटंचाई भासत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्याचबरोबर कचऱ्यांच्या समस्यांना ते रोज तोंड देत आहेत. रस्त्याने जात असताना चोहीकडे कचराच कचरा असून, दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. रस्तेही खराब असून, एकूणच नागरी सेवासुविधांचा बोजवारा उडाल्याने येथील नागरिक संतापले आहेत. या समस्यांबाबत पाटील यांनी वारंवार केडीएमसीकडे पाठपुरावा केला. मात्र, मनपाचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पाटील यांनी पवार यांची भेट घेऊन २७ गावांतील समस्यांचा पाढा वाचला. त्यावर पवार यांनी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
---------------