नगरसेवकांमुळे निर्माण होते पाण्याची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:27 AM2018-01-19T00:27:59+5:302018-01-19T00:28:02+5:30
अंबरनाथ पश्चिम भागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही जीवन प्राधिकरणावर आहे. मात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरणारे अधिकारी नागरिकांना संभ्रमात टाकण्याचे काम करत आहेत
अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिम भागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही जीवन प्राधिकरणावर आहे. मात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरणारे अधिकारी नागरिकांना संभ्रमात टाकण्याचे काम करत आहेत. नगरसेवकांमुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचा आरोप अधिकारी करत आहेत. अधिकाºयांच्या या विधानाला काँग्रेस नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे. प्राधिकरण स्वत:चे अपयश लपवत नगरसेवकांना लक्ष्य करत असल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे. तसेच नगरसेवकांवर खोटे आरोप करणाºया अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी कार्यकारी अभियंंत्यांकडे केली आहे.
मागील १५ दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात जीवन प्राधिकरणाला अपयश येत आहे. अनेक ठिकाणी चुकीच्या पध्दतीने व्हॉल आॅपरेटिंग केले जात असल्याने अनेक भागांना पाणीपुरवठा होत नाही. तसेच अनेक भागांना गरज नसतानाही २० ते २२ तास पाणीपुरवठा होत आहे. त्याचा फटका जावसई गाव, फुलेनगर, कमलाकर नगर, कोहोजगाव, वांद्रापाडा, डीएमसी चाळ, नालंदानगर या भागांना होत आहे. जासवई परिसराला पाणीपुरवठा होत नसल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना उत्तर देताना अधिकाºयांनी स्वत:ची जबाबदारी ही नगरसेवकांवर ढकलली. नगरसेवकांमुळे ही समस्या निर्माण होत असल्याचा आरोप अधिकाºयांनी करून या प्रकरणातून स्वत:ला बाजूला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या नगरसेवकांची नावे अधिकाºयांनी घेतली त्याच नगरसेवकांच्या प्रभागातही पाण्याचा प्रश्न आहे. असे असतानाही अधिकाºयांनी असे आरोप का केले याचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक प्रदीप पाटील आणि उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात नागरिकांनी गोंधळ घातला. पाणी द्या नाहीतर खुर्ची खाली करा अशा घोषणा देत अधिकाºयांना धारेवर धरले.
जीवन प्राधिकरणाचे अधिकारी पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याने ते आपली जबाबदारी दुसºयावर टाकत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. तसेच टँकर लॉबीला खूष करण्यासाठी आणि काही बांधकाम व्यावसायिकांना पाण्याची सोय करण्यासाठी काही भ्रष्ट अधिकारी नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी केला.