देसलेपाडा, संदप, लोढा हेरिटेजमध्ये पाणीसमस्या; नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 11:55 PM2020-10-08T23:55:27+5:302020-10-08T23:55:38+5:30
एमआयडीसी, केडीएमसी करतेय तपासणी
डोंबिवली : शहरातील प्रभाग क्रमांक ११४ भोपर, संदपमध्ये आठ दिवसांपासून तीव्र पाणीसमस्या भेडसावत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने तातडीने पाणीपुरवठ्यासंदर्भात कार्यवाही करून समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भोपर, संदपगाव, देसलेपाडा, लोढा हेरिटेज, नवनीतनगर, भोपर कमानी, भोपरनाला, वीटभट्टी, मयूरेश्वर, माऊलीनगर या भागांमध्ये पाणी येत नसल्याने तेथील सोसायट्या व चाळीत राहणाऱ्यांचे हाल सुरू आहेत. नेहमी या भागात काही ना काही समस्या भेडसावत असून, किमान पाणीसमस्या सोडवून दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली. यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही केडीएमसी, एमआयडीसी एकमेकांकडे बोट दाखवून आमची दिशाभूल करत आहे का, असा सवाल नागरिकांनी केला. नगरसेविका रविना माळी यांच्या पत्रावरून केडीएमसीने एमआयडीसीला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, असे सांगितले होते. त्याचे काय झाले. पावसाळा संपत नाही तोच ही अवस्था असेल, तर आणखी पुढील आठ महिने कसे काढायचे, असा सवालही नागरिकांनी केला. महापालिका असो की अन्य कोणतीही यंत्रणा, पाणी ही मूलभूत गरज असून ते मिळायलाच हवे, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
माळी म्हणाल्या, पाणीसमस्या ही वस्तुस्थिती आहे. केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाला पत्र देऊन थकले आहे. पत्र दिले की, तेवढी वेळ मारून नेली जाते आणि त्यानंतर पुन्हा स्थिती जैसे थे होत असल्याने नागरिकांचे हाल सुरू असून, रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे.
भोपर, संदप व परिसरात पाण्याची समस्या आहे, हे वास्तव आहे. आधी शटडाऊन, त्यानंतर सोमवारी महावितरणच्या वीजवाहिन्या ट्रिप होण्याचा प्रकार घडला. त्यातच मानपाडा भागात जेथून भोपर, संदप, देसलेपाडा येथे पाण्याचे कनेक्शन जाते, तेथे पाण्याचा वेग कमी आहे. तसे का होते, हे देखील केडीएमसी व एमआयडीसी तपासत आहे. ही समस्या लवकरच सुटेल.
- विजय शेलार, उपभियंता, पाणीपुरवठा विभाग, एमआयडीसी