होळीनंतर जिल्ह्याला पाणी दिलासा; पाणीकपात रद्द? महिन्यातून दोनवेळा केली जाते कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 12:10 AM2021-03-26T00:10:42+5:302021-03-26T00:11:06+5:30

कपातीच्या नावाखाली महापालिका व पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणाकडून पाइपलाइनची विविध कामे व दुरुस्ती हाती घेतली जात आहेत.

Water relief to the district after Holi; Emphasis on water cut cancellation movements | होळीनंतर जिल्ह्याला पाणी दिलासा; पाणीकपात रद्द? महिन्यातून दोनवेळा केली जाते कपात

होळीनंतर जिल्ह्याला पाणी दिलासा; पाणीकपात रद्द? महिन्यातून दोनवेळा केली जाते कपात

Next

सुरेश लाेखंडे
 
ठाणे : जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका असलेल्या शहरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ दिवसांतून एकदा, अशी २४ तासांची पाणीकपात लागू केलेली आहे; परंतु आता ती रद्द करण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत. होळीनंतर ती पूर्णपणे रद्द करून शहरांना त्यांचा आवश्यक तीन हजार ६२१ एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्यामुळे गृहिणींची पाणी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

पाणीकपात रद्द करण्याच्या दृष्टीने गुरुवारी बैठक निश्चित केली होती; पण काही अपरिहार्य कारणास्तव ती रद्द झाली; परंतु पुढील आठवड्यापासून म्हणजे होळीनंतर या पाणी कपातीच्या समस्येला आता पूर्णविराम मिळून ती कायमची रद्द करण्याचा निर्णय होऊ घातला आहे. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून महिन्यातून दोन वेळा २४ तासांची पाणी कपात लागू केली आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे; पण त्याहीपेक्षा महापालिका, नगरपालिका आणि पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणांकडून या कपातीच्या कालावधीला धरून दुरुस्तीची कामे काढल्यामुळे पाणी समस्या जिल्ह्यात गंभीर झाली आहे.

कपातीच्या नावाखाली महापालिका व पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणाकडून पाइपलाइनची विविध कामे व दुरुस्ती हाती घेतली जात आहेत. त्यामुळे कपातीचा कालावधी संपलेला असतानाही नागरिकांना तीव्र पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे; पण आता ही कपातही रद्द होणार असल्यामुळे संबंधित महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या मागणीस अनुसरून मुबलक पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे सुतोवाच पाटबंधारे विभागाने केले आहे. कारण आंध्रा व बारवी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आलेला आहे. 

२.८० कोटी लोकसंख्येला लागते ३६२१ एमएलडी पाणी
जिल्ह्यातील भातसा या सर्वाधिक मोठ्या जलाशयासह बारवी धरण, उल्हास नदी, मोरबे, पिसे आदी धरणांतून बृहन्मुंबई महापालिकेसह जिल्ह्यातील ठाणे व उर्वरित पाच महापालिका, दोन नगर परिषदा, दोन नगरपंचायती, बहुतांश ग्रामपंचायती आदींमधील सुमारे दोन कोटी ८० लाख लोकसंख्येला रोज तीन हजार ६२१ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा होतो. पण सध्या १५ दिवसांतून २४ तासांची पाणीकपात लागू केल्यामुळे या सुरळीत पाणीपुरवठ्यात खंड पडला होता. तो आता अखंडितपणे सुरू राहणार आहे.

मुंबई महापालिकेला भातसासह मोडकसागर, अपर वैतरणा, मध्य वैतरणातून पाणीपुरवठा होतो. याप्रमाणेच ठाणे मनपाला ४२२ एमएलडी पाणीपुरवठा, भातसा, शहाड टेमघर एमआयडीसी आणि पिसे धरणातून होत आहे. नवी मुंबईला ३३० एमएलडी पाणी मोरबे, हेटवणे आणि बारवी धरणातून सुरू आहे. कल्याण-डोंबिवली २६४, भिवंडी ११० व मीरा-भाईंदरला ९१ एमएलडी पाणीपुरवठा शहरांना टेमघर व एमआयडीसीद्वारे सुरू आहे. बदलापूरला ३७, अंबरनाथ ५५, उल्हासनगर १२० एमएलडी पाणीपुरवठा बारवी व उल्हास नदीतून एमआयडीसह महाराष्ट्र जीवन (एमजेपी) प्राधिकरणाकडून रोज होत आहे. शहरांच्या वाढीव लोकसंख्येस अनुसरून या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी बारवी धरणाची उंची दोन मीटरने वाढवली. एमआयडीला १६० एमएलडी पाणीपुरवठाही बारवीतून होत आहे.

Web Title: Water relief to the district after Holi; Emphasis on water cut cancellation movements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.