केडीएमसीने घेतले पाण्याचे नमुने
By admin | Published: April 20, 2017 03:59 AM2017-04-20T03:59:33+5:302017-04-20T03:59:33+5:30
पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ३०, चिखलेबाग येथील आसमान इमारतीत मंगळवारी पिण्याच्या पाण्यात गांडूळ तसेच अन्य किडे आढळले होते.
कल्याण : पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ३०, चिखलेबाग येथील आसमान इमारतीत मंगळवारी पिण्याच्या पाण्यात गांडूळ तसेच अन्य किडे आढळले होते. याबाबतचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच केडीएमसीच्या पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले.
रामबाग जैन सोसायटी परिसरातील आसमान बिल्डिंगमध्ये पिण्याच्या पाण्यातून किडे आणि गांडूळ आल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. यासंदर्भात रहिवाशांनी केडीएमसीचा पाणीपुरवठा विभाग व महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे तक्रार केली होती. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांच्या जीवाशी चालणारा खेळ त्वरित थांबवावा आणि जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली होती. परंतु, कोणीही त्याची दखल घेतली नाही.
दरम्यान, यासंदर्भात ‘ऐन उन्हाळ्यात किडेमिश्रित पाणीपुरवठा’ या मथळ्याखाली बुधवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. यामुळे खडबडून जागे झालेल्या पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी आसमान बिल्डिंगला भेट देत तेथील पाण्याच्या टाकीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी केली. त्या वेळी पाण्यातील क्लोरिनचे प्रमाण कमी असल्याचे आढळले. पाणीपुरवठा सुरू होईल, त्या वेळीही नमुने घेतले जातील, असे स्पष्टीकरण पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आले. (प्रतिनिधी)