जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीच्या वादात अंबरनाथमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:36 AM2021-03-15T04:36:35+5:302021-03-15T04:36:35+5:30

अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागात अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून मोर्चे ...

Water scarcity in Ambernath in dispute between Jeevan Pradhikaran and MIDC | जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीच्या वादात अंबरनाथमध्ये पाणीटंचाई

जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीच्या वादात अंबरनाथमध्ये पाणीटंचाई

Next

अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागात अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून मोर्चे आणि आंदोलने करण्याचे इशारे देण्यात येत आहेत. शहरात पुढील काही दिवसांत पाणी समस्येमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका येथून चार एमएलडी पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी कार्यकारी अभियंता शिंदे यांनी एमआयडीसीकडे केली आहे.

२०२० मध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर अंबरनाथच्या शिवाजीनगर, वडवली आणि काही भागाला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण तुडुंब भरून वाहू लागले होते. मात्र धरणातून दूषित आणि गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे, आंदोलने केली होती. त्यानंतर धरणाची उंची वाढवण्याचे काम हाती घेतल्यानंतर चिखलोली धरणातून पाणीपुरवठा थांबवून एमआयडीसीकडून पाणी घेऊन पाणीटंचाईवर तोडगा काढण्यात आला होता. मात्र एकूण पाणीपुरवठ्याच्या केवळ ७० टक्के पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास केला जात आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सलग बारा तास सर्व आटे उघडून पाणीपुरवठा करण्याची मागणी एमआयडीसीकडे करण्यात आली आहे.

अंबरनाथ शहराला बदलापूर येथील उल्हास नदीवरील बॅरेज बंधाऱ्यातून सर्वाधिक ५० एमएलडी पाणी मिळते. त्यासोबतच एमआयडीसीच्या माध्यमातून मिळणारे १० एमएलडी आणि चिखलोली धरणातून ६ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. चिखलोली धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सहा एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे महालक्ष्मीनगर, शिवाजीनगर, वडवली, कृष्णनगर या जवळपास एक लाख लोकवस्तीच्या परिसराला एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. त्यातच एमआयडीसीने महिन्यातून दोनदा पाणी कपात लागू केली आहे. त्यानंतर चिखलोली धरणातूनही पाणी मिळणार नसल्याने अंबरनाथकरांची पाणी समस्या गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

..................

Web Title: Water scarcity in Ambernath in dispute between Jeevan Pradhikaran and MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.