डोंबिवलीतील भोपर, देसलेपाड्यात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:43 AM2021-09-18T04:43:06+5:302021-09-18T04:43:06+5:30
कल्याण : डोंबिवली पूर्वेतील भोपर, देसलेपाड्यातील साईराज इमारतीमधील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाणीटंचाईला कंटाळून रहिवाशांनी उपोषण ...
कल्याण : डोंबिवली पूर्वेतील भोपर, देसलेपाड्यातील साईराज इमारतीमधील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाणीटंचाईला कंटाळून रहिवाशांनी उपोषण करण्याचा इशारा केडीएमसी प्रशासनास दिला आहे.
साईराज इमारतीत ८० सदनिकाधारक असून, त्यांना चार महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ते त्रस्त आहेत. रहिवाशांना दररोज पाण्याचा टँकर मागवावा लागतो. लहान आकाराच्या टँकरला ५०० रुपये, तर मोठ्या आकाराच्या टँकरला त्यांना दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे दररोज होणारा हा खर्च त्यांना परवडणारा नाही.
रहिवासी विजय नाईक आणि संजय शिंदे यांनी सांगितले की, पाणीप्रश्नाबाबत आम्ही नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, त्यांच्याकडून केवळ आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात ठोस उपाययोजना केली जात नाही. केडीएमसीच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला, तर अधिकारी नवीन नळजोडणी घ्या, असा सल्ला देता. परंतु, जुन्या जोडणीवर केलेल्या खर्चाचे काय? काही ठिकाणी नवीन नळजोडणी दिलेले आहे. परंतु, त्यामुळे पाणी विभागले जात असून, आम्हाला पाणी कमी दाबाने मिळते. पाणीसमस्या सुटत नसल्याने आम्ही केडीएमसीच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिला आहे.
--------------