लालफितशाहीमुळे पाणीटंचाई; पुरेसा पाऊस पडूनही शहरे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 12:24 AM2020-12-28T00:24:46+5:302020-12-28T00:25:36+5:30

पुरेसा पाऊस पडूनही शहरे तहानलेलीच : जनसामान्यांचे नाहक हाल

Water scarcity due to red tape | लालफितशाहीमुळे पाणीटंचाई; पुरेसा पाऊस पडूनही शहरे तहानलेलीच

लालफितशाहीमुळे पाणीटंचाई; पुरेसा पाऊस पडूनही शहरे तहानलेलीच

Next

-पंकज पाटील

अंबरनाथ : अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरून वाहत होती, तरीही शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जीवन प्राधिकरणाकडे शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी आहे. प्राधिकरणाने एमआयडीसीची थकबाकी भरण्यात विलंब लावल्याने शहरात पाणीपुरवठा कमी होत असून, नाहक त्रास येथील करदात्यांना सहन करावा लागत आहे.

अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही जीवन प्राधिकरणावर आहे. प्राधिकरण उल्हास नदीतून ४७ दशलक्ष लीटर पाणी उचलते, तर एमआयसीडीकडून १० दशलक्ष लीटर पाणी घेते. सोबत चिखलोली धरणातून सहा दशलक्ष लीटर पाण्याची सोय करण्यात आली आहे. शहराला ६३ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असतानाही तो कमी पडत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याची गळती. तब्बल ३५ टक्के पाणी गळती असल्याने मुबलक पाणी असतानाही प्राधिकरणाला शहरात योग्य दाबाने पाणीपुरवठा करता येत नाही.

त्यातच चिखलोली धरणातील पाणी दूषित झाल्याचे कारण पुढे करून प्राधिकरणाने पुरवठा बंद केला आहे. मात्र, त्याच्या मोबदल्यात वाढीव पाण्याची गरज भागविण्याची जबाबदारी एमआयडीसीकडे आहे. मात्र, चिखलोली धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी एमआयडीसी तयार होत नसल्याने अडचणी वाढत आहेत. जीवन प्राधिकरणाच्या अंगावर पाणीबिलापोटी मोठी रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे एमआयडीसी प्राधिकरणाला वाढीव पाणी देण्यास तयार नाही. या गोंधळामुळे शहरात महिन्याभरापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

आता शहरात पाण्यासाठी आंदोलने होत असल्याने प्राधिकरणाने लागलीच थकीत बिलांपैकी सात कोटी ५० लाख रुपये एमआयडीसीकडे भरले आहेत. त्यामुळे आता वाढीव चार दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध झाले आहे. असे असले, तरी अजूनही दोन दशलक्ष लीटर पाण्याची तूट कायम आहे. शहरातील टंचाई ही जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी यांच्या वादात अडकली आहे, तर दुसरीकडे एमआयडीसीच्या बारवी धरणातून वाढीव पाणी मिळण्यास विलंब होत असल्याने त्याचा दुहेरी फटका शहराला बसत आहे.

Web Title: Water scarcity due to red tape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.