ठाणे जिल्ह्यात योजना राबवूनही पाणी टंचाई हटेना
By अजित मांडके | Published: March 6, 2024 04:21 PM2024-03-06T16:21:45+5:302024-03-06T16:22:41+5:30
४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा.
अजित मांडके, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील गाव पाड्याना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा पोहोचत असतात. त्यामुळे येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जलजीवन मिशन, विंधन विहीर अशा विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. हर घर नळाद्वारे पाणी या योजनेंतर्गत लाखो कुटुंबियांची पाण्याची भटकंती थांबल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असतांना दुसरीकडे, मार्च महिन्यातच शहापूर तालुक्यातील ४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे.
ठाणे जिल्ह्यात दरवर्षी मार्च ते मे या तीन महिन्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या भेडसावत असते. तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा व त्यासाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा तयार केला होता. जिल्ह्याला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागते ते अगदी जून-जुलैपर्यंत ही पाणी टंचाईची झळ सोसावी लागते.
त्यासाठी दरवर्षी कोट्यावधींचा निधी खर्चून टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, विहीरी खोलीकरण, गाळ काढणे, नविन विंधन विहीर घेणे आणि विंधन विहींची दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात येत असतात. यामध्ये नळ पाणी पुरवठा योजनेसह पूरक नळ पाणी पुरवठा योजनेवर सर्वाधिक खर्च अपेक्षित धरण्यात येत असतो. त्यात जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेली कामे यांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला असून ग्रामीण भागातील अनेक गावपाड्यांची पाणी टंचाई मुक्तीकडे वाटचाल सुरु झाल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.
दरम्यान, असे असले तरी, मार्च महिन्यातच शहापूर तालुक्यात पाणी टंचाईची दाहकता कायम असल्याचे चित्र दिसून येत असून या तालुक्यातील ४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची बाबा समोर आली आहे.
ही आहेत गावपाड्यांची संख्या : शहापूर तालुक्यातील गावांची नावे फूगाळे, दांड, काळभोंड, कोथळे, माळ, विहिगाव, उमरावणे, उंबरखांड तर, नाराळवाडी, पारधवाडी, अघणवाडी, भुईपाडा, चिंतामणवाडी, कोळीपाडा, वारली पाडा आदी पड्यांची नवे आहेत.