ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा; शहापूरच्या ४२ गांवपाड्यांना १५ टॅकरद्वारे पाणी पुरवठा
By सुरेश लोखंडे | Published: March 5, 2024 03:43 PM2024-03-05T15:43:29+5:302024-03-05T15:43:42+5:30
शहापूरच्या ४२ ग्राम पंचायतींमधील आठ माेठ्या गांवासह ३४ आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांचा या टंचाईत समावेश आहे.
ठाणे : जिल्ह्यातील महापालिका, बृहन्मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागात तीव्र पाणी टंचाई सुरू झाली आहे. भिवंडी, मुरबाड तालुक्यातील गावांमध्ये कमी अधीक टंचाई सुरू झाली आहे. मात्र भातसा, तानसा, वैतरणा, मध्यवैतरणा, अप्पर वैतरणा आदी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यात तब्बल ४२ गांवपाड्यातील १२ हजार ६८३ लाेकसंख्या तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहे. त्यांना १५ टॅंकरव्दारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे.
यंदा जिल्ह्यात उत्तम पाऊस हाेऊनही जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागात पाणी टंचाई सुरू झाली आहे. अन्य तालुक्याच्या तुलनेत सध्या शहापूर तालुक्यात या टंचाईने गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रारंभीच उग्र रूप धेतले आहेत. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत अवध्या आठ टॅंकरव्दारे २६ गांवपाड्यांना पाणी पुरवठा सुरू हाेता. पण यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच टॅंकरची संख्या दुप्पट हाेऊन टंचाईग्रस्त गांवपाड्यांची संख्याही दुपट्टीने वाढल्याचे वास्तव उघड झाले आहे. त्यांच्या या समस्येवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा परिष्ज्ञदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून लक्ष केंद्रीत करण्यात आले असून १५ टॅंकरच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे.
शहापूरच्या ४२ ग्राम पंचायतींमधील आठ माेठ्या गांवासह ३४ आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांचा या टंचाईत समावेश आहे. यामध्ये कसारा ग्राम पंचायतीमधील नारळवाडी, दांड,या गांवासह पारधवाडीचा समावेशअआहे. तर फुगाळे ग्राम पंचायतीसह त्यातील आघाणवाडी, भुईपाडा, चिंतामणवाडी, बिबळवाडी आदींचा समवेश आहे. तर कळभाेंडे, काेथळे या ग्राम पंचायतीत टंचाई सुरू झाली. अजनुपमध्ये आठ पाड्यांना टंचाईच्या झळा आहे. काेठारेगावाजवळील काेळीवाडा, विहिगांवसह तीन पाड्यांमध्ये टंचाई आहे. याशिवाय वाशाळा, माळ, वेळूकच्या पाड्यामध्ये टंचाई सुरू आहे. उंबरखांड, वारस्काळ ग्रामपंचायतीमधील सहा पाडे, ढाढरेमधील उंबरवाडी आदी गांवे व आदिवासी पाडे तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहेत.