बातरेपाडा रावतेपाड्यात नदीपात्रात खड्डा खोदून मिळते घोटभर पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 01:58 AM2019-05-07T01:58:04+5:302019-05-07T01:59:01+5:30
भिंवडी तालुक्यातील मैदे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या बातरेपाडा, रावतेपाडा आणि हारेपाड्यातील आदिवासी - कातकरी वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
- रोहिदास पाटील
अनगाव - भिंवडी तालुक्यातील मैदे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या बातरेपाडा, रावतेपाडा आणि हारेपाड्यातील आदिवासी - कातकरी वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील महिला हंडाभर पाण्यासाठी गावाबाहेरील नदी पात्रात खड्डा खोदून दूषित पाणी घेऊन येतात. दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या तीव्र पाणी टंचाईकडे भिवंडी पंचायत समिती पाणी पूरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून याचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो आहे. दरम्यान, पाणी टंचाईबाबत वारंवार सांगूनही याप्रकरणी काहीही उपाय न केल्याने श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी गटविकास अधिकारी तसेच पाणीपुरवठा अभियंत्यांना घेराव घातला.
बातरेपाडा, रावते पाडा, हारेपाडा येथील परिसरातील महिला नदीत खड्डा खोदून जिथे ओहोळ दिसेल तिथे पाणी गोळा करतात. पाणी दूषित आहे हे दिसत असूनही स्वत:सह मुलाबाळांना देखील तेच पाणी देतात. या भागातील बोरवेलचे पाणी देखील दूषित आहे. खूप प्रयत्न करून हंडाभर पाणी मिळाले तरी ते पिवळे असते. भिवंडी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या या पाड्यामध्ये पाणी टंचाई असल्याचे लेखी निवेदन पाणीपुरवठा उपअभियंता ए. जी. राऊत, शाखा अभियंता सुदेश भास्करराव यांना सहा महिन्यांपूर्वी दिलेले आहे. असे असतानाही पाणीपुरवठा विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील आदिवासींना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. या पाड्यामधील टंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करतानाही दिसत नाही. या तीनही पाड्यात पाणी टंचाई असल्याच्या तक्रारी गटविकास अधिकारी तसेच पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे केलेल्या आहेत. महिनाभरापूर्वी पाण्यासाठी महिलांची भांडणे झाली, त्याबाबत पडघा पोलिसांत तक्र ार दाखल झाली असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती मैदे गावातील सुरेखा पाटील यांनी दिली.
येथील आदिवासींना खड्ड्यातील पाणी प्यावे लागत असून येथील लोकप्रतिनिधी याकडे लक्ष का देत नाहीत? निवडणुकीत मते मागतात, विकास करण्याची आश्वासने देतात. यांना आमच्या समस्या दिसत नाहीत काय, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत.
या पाड्यात दरवर्षी पाणी टंचाई होते. ती दूर करण्याचे काम प्रशासनाचे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. येथे तात्काळ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा. - आशा भोईर, संघटक, श्रमजीवी संघटना, भिंवडी तालुका
या पाड्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, हे खरे आहे. ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- भुºया गव्हाले, ग्रामसेवक, ग्रामपंचायत मैदे