कल्याणच्या ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:41 AM2021-03-27T04:41:54+5:302021-03-27T04:41:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : तापमानाचा पार वाढत असताना कल्याण ग्रामीण भागातील बहुतांश गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. डोंबिवलीतील ...

Water scarcity in rural areas of Kalyan | कल्याणच्या ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा

कल्याणच्या ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : तापमानाचा पार वाढत असताना कल्याण ग्रामीण भागातील बहुतांश गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. डोंबिवलीतील सांगाव-सांगर्ली प्रभागातील नागरिक पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. पाणीसमस्या सोडवावी, यासाठी तेथील भाजपच्या माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी वारंवार शहरातील एमआयडीसीच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला. मात्र, एमआयडीसीने त्याला केराची टोपली दाखविल्याने पाटील यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांना पाणीकपात रद्द न केल्यास आणि पाण्याचे समान वितरण न केल्यास आत्मदहन करू, असा इशारा पत्राद्वारे गुरुवारी दिला आहे.

उन्हाळा सुरू होताच काही भागांतील रहिवाशांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. एमआयडीसी आणि महापालिका प्रशासन यांच्यात पाणी बिल थकबाकीवरून अनेक वर्षांपासून तिढा सुटत नसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. कधी पाणीकपात, तर कधी टंचाई, यामुळे तेथील रहिवासी घराबाहेर पहाटे चार वाजता नळावर पाणी भरण्यासाठी रांग लावतात. टँकरने पाणी मागवावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसतो. अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती असल्याने नागरिक लोकप्रतिनिधींना जाब विचारतात, त्यांना उत्तर काय देणार, असा सवाल पाटील यांनी केला.

२७ गावांची पाणी बिल थकले आहे. केडीएमसीने २०१६ मध्ये २७ गावांच्या पाणी बिलापोटी फक्त पाच कोटी रुपयांचा भरणा एमआयडीसीकडे केला होता. उर्वरित ४१८ कोटी रुपये थकीत आहेत. थकबाकी व नियमित देयकांचा भरणा होत नसल्याने एमआयडीसीने २७ गावांत पाणीकपात करावे लागत असल्याचे केडीएमसाला पत्राद्वारे कळविले आहे. वास्तविक, २७ गावे मनपात समाविष्ट झाल्यानंतर तेथील गावांना पाणी, रस्ते आणि इतर सुविधा नागरिकांना व्यवस्थित मिळवून देणे ही मनपाची जबाबदारी आहे, असे पाटील म्हणाल्या. मनपा यातून मार्ग काढण्याऐवजी पाणी बिल थकवत आली आहे. गेली पाच वर्षे मनपा हेच करीत आल्याने गावांतील जनतेला पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. नागरिक मात्र लोकप्रतिनिधींना याचा जाब विचारत आहेत. लोकप्रतिनिधी एमआयडीसी, तर कधी मनपा कार्यालयात हेलपाटे मारतात. मात्र, थकबाकी भरत नाही, तोपर्यंत पाणीकपात करीत राहणार, अशी एमआयडीसीची भूमिका असल्याचे समजले. त्यामुळे या सर्वांवर तत्काळ उपाययोजना करा, अन्यथा पाण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.

-----------

Web Title: Water scarcity in rural areas of Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.