बदलापूरमधील शिरगावच्या सोसायट्या टँकरवर अवलंबून, शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेत घोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 01:42 AM2019-05-10T01:42:02+5:302019-05-10T01:42:04+5:30
बदलापूर शहराला लागून उल्हास नदी असतानाही या शहरातील काही भागात तीव्र पाणी टंचाई आहे.
बदलापूर - बदलापूर शहराला लागून उल्हास नदी असतानाही या शहरातील काही भागात तीव्र पाणी टंचाई आहे. शिरगांव परिसरात सर्वाधिक पाणीटंचाई असून या भागातील बहुसंख्य गृहसंकुले ही आजही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अशीच काहीशी परिस्थिती सोनिवली गांव परिसरात निर्माण झाली आहे.
कुळगांव-बदलापूर नगरपरिषद हद्दीतील परिसराला जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. बदलापुरात वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, शहरातील काही भागात तीव्र पाणीटंचाई आहे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेत घोळ असल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे.
शिरगांव परिसरात मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहिल्याने त्यांना गरजेनुसार पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. या परिसरात हजार ते दीड हजार घरांचे प्रकल्प उभे राहिले आहेत. ज्या प्रमाणात घरांची आणि इमारतींची उभारणी झाली आहे, त्या प्रमाणात जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत. कमी व्यासाच्या जलवाहिन्यांवर अनेक इमारतींना नळजोडणी दिल्याने प्रत्येक इमारतीला मुबलक पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे काही भागात केवळ अर्धा तास पाणी सोडले जात असल्याने ते संपूर्ण इमारतीला पुरवणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक सोसायट्या पिण्यासाठी टँकरचे पाणी वापरत आहेत. ज्या इमारतींना पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही अशा इमारतींना टँकरने पाणी देण्याची सोय केली आहे. मात्र, त्याचे योग्य ते दर संबंधित टँकर चालकांना द्यावे लागत आहेत. परिणामी, टँकरच्या महागड्या पाण्याकरिता बदलापूरकरांच्या खिशाला खार लागत आहे.
शिरगावातील सॅफ्रॉन हिल्स, गुरू प्रेरणा, लाईफ स्टाईल या गृहसंकुलांना मुबलक पाणी मिळत नसल्याने त्यांना टँकरचे पाणी मागवण्याची वेळ आली आहे. या भागातील अनेक गृह प्रकल्पातील कूपनलिका बंद पडल्याने दररोज लागणारे पाणी टँकरच्याच माध्यमातून उपलब्ध करावे लागते.
वाढीव पाणीपुरवठा योजनेतून शिरगांव परिसरात स्वतंत्र जलकुंभ आणि विस्तारीत जलवाहिन्या टाकण्याचे काम या आधीच केलेले आहे. मात्र, पाण्याची उपलब्धता कमी पडत असल्याने पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. बदलापूर शहराला बारवी धरणातून अतिरिक्त पाणी उपलब्ध होत नाही तोवर शहराच्या सीमेवर असलेल्या भागाला मुबलक पाणी उपलब्ध करुन देणे अशक्य आहे. ब्शहरातील बहुसंख्य टँकर हे शिरगांव परिसरातील सोसायटीमध्येच फेऱ्या मारतांना दिसत आहेत. सोसायटीमधील सुरक्षा रक्षकाला सुरक्षेपेक्षा टँकरचे पाणी पंपाद्वारे घरांना व्यवस्थित पुरवण्याचे काम करावे लागते.
शिरगांव भागात पाणीटंचाई ही काही नवीन नाही. काही भागात पाणी येत असले तरी ते अर्धा तासापेक्षा जास्त मिळत नाही. एवढ्या कमी वेळेत इमारतीमधील घरांना पाणी पुरवणे शक्य नाही. त्यामुळे बाहेरून टँकर मागवण्याची वेळ येते. - अविनाश मोरे, रहिवासी, शिरगांव