महापौरांच्या प्रभागात पाणी टंचाई, मनसेचं उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 05:51 PM2020-11-02T17:51:36+5:302020-11-02T17:55:11+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन परिसरात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. याच प्रभाग क्रं-१४ मधून महापौर लीलाबाई अशान सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत
सदानंद नाईकउल्हासनगर : महापौर लीलाबाई अशान यांच्या मराठा सेक्शन परिसरातील पाणी टंचाईच्या निषेधार्थ मनसेने सोमवारी उपोषण केले. अतिरिक्त आयुक्त व पाणी पुरवठा विभागाच्या आश्वासनानंतर मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष मनसेने उपोषण मागे घेतले.
उल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन परिसरात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. याच प्रभाग क्रं-१४ मधून महापौर लीलाबाई अशान सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. गेल्या महिन्यात पाणी टंचाईच्या निषेधार्थ शेकडोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. कोरोना काळात नागरिक रस्त्यावर उतरल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांना मिळाल्यावर, त्यांनी घटनास्थळी धाव घेवून नागरिकांची समजूत काढली. तसेच काही नागरिकांना पोलिस ठाण्यात बोलावून महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी दिलीप सोनावणे यांच्या सोबत बोलून पाणी टंचाई सोडविण्याचे आश्वासन घेतले होते. मात्र त्यानंतरही अनियमित पाणी पुरवठा कायम आहे. या निषेधार्थ मनसेने उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले.
मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी सोमवारी जिजामाता गार्डन येथे पाणी टंचाईच्या निषेधार्थ उपोषण सुरू करताच महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले. अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकार यांनी मनसेचे सचिन कदम यांच्यासह पक्ष पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून उपोषण मागे घेण्यास सांगितले. अखेर पाणी पुरवठा विभाग जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरणे, जलकुंभाची साफसफाई, जलकुंभ दुरस्ती व रंगरंगोटी, अवैध नळजोडणी खंडित करणे, ठरलेल्या वेळेत पाणी पुरवठा करणे. आदी आश्वासन पाणी पुरवठा विभागाने दिल्यावर सचिन कदम यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. तसेच पुन्हा पाणी टंचाई निर्माण झाल्यास, अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
कृत्रिम पाणी टंचाई व मनसेची स्टंटबाजी... महापौर लीलाबाई अशान
महापालिकेला कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असून जलकुंभाच्या जलवाहिन्या मध्यंतरी फुटल्याने पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर महापालिकेने जलवाहिन्या दुरस्तीचे काम केल्यावर पाणी नियमित व मुबलक असून मनसेचे उपोषण म्हणजे स्टंटबाजी असल्याची प्रतिक्रिया महापौर लीलाबाई अशान यांनी दिली आहे.