अंबरनाथ-बदलापूरमधील पाणीयोजना अद्याप अर्ध्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:10 AM2019-06-04T00:10:27+5:302019-06-04T00:10:41+5:30

एमजेपीकडून पाणीपुरवठा योजनाच नव्हे तर भिवंडी, कल्याण परिसरातील मलनि:सारणाची कामेदेखील अर्धवट झाली असल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात आहे.

The water scheme of Ambernath-Badlapur is still half-way | अंबरनाथ-बदलापूरमधील पाणीयोजना अद्याप अर्ध्यावरच

अंबरनाथ-बदलापूरमधील पाणीयोजना अद्याप अर्ध्यावरच

Next

सुरेश लोखंडे 

ठाणे : जीवघेण्या पाणीटंचाईचा काळ संपत आलेला आहे. अवघ्या काही दिवसांत पाऊस पडणार आहे. पण, महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) नियंत्रणातील अंबरनाथ, बदलापूर शहरांच्या पाणीपुरवठा योजनेची कामे अद्यापही अर्धवट आहेत. तर, पाण्याच्या शोधात वणवण भटकणाऱ्या २७ गावांच्या योजनेसाठी अद्यापही ठेकेदाराचा शोध सुरू आहे. एमजेपीच्या या गलथानपणाविरोधात लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

एमजेपीच्या यंत्रणेद्वारे बहुतांशी कामे अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, भिवंडी आणि २७ गावांच्या पाणीपुरवठ्याची कामे सुरू आहेत. पण, ढिसाळ व निष्काळजी व्यवस्थापनामुळे लोकांच्या जिव्हाळ्याची ही कामे मंदगतीने सुरू आहेत. यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचीदेखील डोकेदुखी वाढली आहे. एमजेपीच्या या निष्काळजीपणाला वैतागून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याची तंबी पालकमंत्र्यांनी दिली आहे. बदलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी ५९ किमीच्या पाइपलाइनचे काम सुरू आहे. पण, आतापर्यंत ४३ किमीचे काम पूर्ण झाल्याचे एमजेपीकडून स्पष्ट केले जात आहे. तर, अंबरनाथच्या पाइपलाइनचे सात किमीचे काम अजून अर्धवट असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.

एमजेपीकडून पाणीपुरवठा योजनाच नव्हे तर भिवंडी, कल्याण परिसरातील मलनि:सारणाची कामेदेखील अर्धवट झाली असल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात आहे. एमजेपीचे जिल्ह्यात कोठेही चांगले काम नसून ते पूर्णही झालेले नसल्यामुळे पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. २७ गावांची पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी आदेश जारी झाले आहेत. मात्र, ही योजना अजूनही निविदेतच अडकली आहे. दोनवेळा फेरनिविदा काढूनही केवळ दोन निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यांच्या मंजुरीसंदर्भात एमएजेपीचे वेलरासूंकडे प्रस्ताव पाठवल्याचे नमूद करून एमजेपीने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्वच कामांच्या बाबतीत एमजेपीची निष्काळजी दिसून येत आहे. एमजेपीच्या कामांना ठेकेदार का मिळत नाही, अशी विचारणादेखील खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.

पाणीयोजना अडवणाºया भंगारवाल्यांवर कारवाई करा
नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या व सध्या जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात असलेल्या १४ गावांच्या ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तेथील हातपंपाचे केमिकलमिश्रित पाणी ग्रामस्थ वापरत असल्याचे जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सांगितले. तहान भागवण्यासाठी पिण्याचे पाणी कसेबसे मिळवणाºया ग्रामस्थांना दोन दिवस कपडे धुण्यासाठी पाणी मिळत नाही. या गावकऱ्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना टाकण्यात येत आहे. मात्र, येथील भंगारवाल्याकडून ती अडवण्यात आली आहे. त्यांच्याकडून या कामास विरोध झाल्यामुळे या योजनेचे काम रखडले आहे. या योजनेस मार्गी लावण्यासाठी पोलिसांना या भंगारवाल्यावर कडक कारवाई करण्याचे फर्मान पालकमंत्र्यांकडून देण्यात आले.

पेंढरघोळच्या विहिरीचे ८० टक्के काम
मुरबाड तालुक्यातील पेंढरघोळ येथे विहीर खोदली असून त्यास या कडकडीत उन्हाळ्यात पाणी लागले आहे. या विहिरीचे बांधकाम त्वरित करण्याचे काम पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेटीद्वारे दिले. पण, अजूनही केवळ ८० टक्के काम झाल्याचे ऐकून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर, मुरबाड तालुक्यासाठी सिंटेक्स टाक्या मंजूर झालेल्या असूनही त्या अद्याप पाठवण्यात आलेल्या नसल्यामुळे कथोरे यांनी नाराजी व्यक्त केली.

गाळ काढण्यासाठी पोकलेन-जेसीबी
शहापूर तालुक्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी कोरड्या धरणाच्या बंधाºयांचा गाळ काढण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. त्यासाठी किती जेसीबी, पोकलेन मशीन, डम्पर लागणार ते वेळीच सांगा. त्यासाठी जास्तीतजास्त १० लाखांचा खर्च येणार आहे. तो त्वरित देण्याचे सांगून तसे नियोजन करावे, असे पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेस सांगितले.

Web Title: The water scheme of Ambernath-Badlapur is still half-way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.