अंबरनाथ नगरपालिका कार्यालयात शिरले पाणी; पालिकेचे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 01:57 PM2021-07-19T13:57:06+5:302021-07-19T13:57:28+5:30
सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्याने अंबरनाथ नगरपालिकेच्या समोरील नाला भरून वाहत होता.
अंबरनाथ: मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यातच अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यालयत देखील पाणी आल्याने कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. काही कार्यालयांमध्ये महत्वाच्या फाईल देखील भिजल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, तर भंडार विभागातील अनेक सामान पाण्याखाली आले आहे.
सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्याने अंबरनाथ नगरपालिकेच्या समोरील नाला भरून वाहत होता. त्यातच पाण्याचा प्रवाह बंद असल्याने हे संपूर्ण पाणी थेट पालिका कार्यालयात आले. त्यामुळे नगराध्यक्ष दालन, मुख्याधिकारी यांचे कार्यालय, अतिरिक्त मुख्याधिकारी दालन, घरपट्टी विभाग, भांडार विभाग, बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, सामान्य प्रशासन विभाग, विद्युत विभाग आणि महिला बाल कल्याण विभागात मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. अचानक हा प्रकार घडल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या फाईल्स आणि सामान देखील हलवता आले नाही.
पाण्याची पातळी वाढत असल्याने तात्काळ भांडार विभागातील महत्त्वाचे साहित्य टेबलावर ठेवून जास्तीत जास्त सामान वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर घरपट्टी विभागामधील काही फाइल्स पाण्यात भिजल्या होत्या. मुख्य अधिकारी आणि अतिरिक्त मुख्याधिकारी यांच्या दालनात देखील पाणी गेल्याने या दालनातील पाणी बाहेर काढण्याचे काम कर्मचारी करीत होते. अचानक पाणी गेल्याने पालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा हा शहरातील पाणी साचलेल्या भागांतवर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करीत होते.