जिल्ह्यातील ११२ गावपाड्यांची पाणीटंचाई दूर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:42 AM2021-05-21T04:42:43+5:302021-05-21T04:42:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सतत पाणीटंचाई असलेल्या जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागातील रहिवाशांना मुबलक पाणी देण्यासाठी ११२ गावांच्या पाणीपुरवठा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सतत पाणीटंचाई असलेल्या जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागातील रहिवाशांना मुबलक पाणी देण्यासाठी ११२ गावांच्या पाणीपुरवठा योजना व २४ तास पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेलसाठी तब्बल ४९ कोटी ७४ लाखांचा निधी पालकमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंजूर केल्याचा दावा ठाणे जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष सुभाष पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
जिल्ह्यातील गावपाड्यांमधील पाणीटंचाई कायमची संपविण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदने ३२ कोटी २९ लाख रुपये खर्चून ८० गावांसह १६२ पाडे आदी २४२ गावागावात तब्बल २५० नवीन बोअरवेल व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. तर, ११२ गावांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजना व जुन्यांच्या दुरुस्तीसाठी १७ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर करून त्याच्या खर्चाला पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी एकमताने मान्यता दिली, असे पवार यांनी सांगितले.
यात ३० गावांमध्ये नव्या पाणीपुरवठा योजना हाती घेतल्या आहेत. तर, ५८ गावांमधील योजनांची दुरुस्ती केली जाणार आहे. याशिवाय २४ गावांमधील योजनांची विशेष दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. याप्रमाणेच ३२ कोटी २९ लाखांच्या निधीतून ८० गावांतील १६२ पाड्यांसाठी २५० बोअरवेल नव्याने खोदण्यात येत आहेत. तर, सहा गावांमधील १७ बोअरवेलची दुरुस्ती केली आहे. जिल्ह्यातील १५ गावे व १३ पाड्यांवर सुमारे आठ कोटी रुपये खर्चून तात्पुरत्या पूरक नळपाणीपुरवठा योजना हाती घेतल्या. तर, सुमारे १९ कोटी रुपये खर्चून ७६ गावे व ५२ वाड्यांमधील १२९ जुन्या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती केल्याचा दावाही पवार यांनी केला.
.........