उल्हासनगरमध्ये ऐन दिवाळीत पाणीटंचाई ?; पाणीपुरवठा विभागाचे कानांवर हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 11:56 PM2020-11-08T23:56:18+5:302020-11-08T23:56:25+5:30

बिल थकले

Water shortage in Ain Diwali in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये ऐन दिवाळीत पाणीटंचाई ?; पाणीपुरवठा विभागाचे कानांवर हात

उल्हासनगरमध्ये ऐन दिवाळीत पाणीटंचाई ?; पाणीपुरवठा विभागाचे कानांवर हात

Next

उल्हासनगर :  महापालिकेने सात महिन्यांपासून एमआयडीसीचे पाणीबिल दिले नसल्याने ऐन दिवाळीत पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे महापालिकेने पाणीबिल दिले नसल्याची माहिती मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांनी दिली. तर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी.एम. सोनवणे यांना याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचा पाणीस्रोत नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. एमआयडीसी शहराला दररोज १४० एमएलडी पाणीपुरवठा करत असून महिन्याला महापालिका पाणीबिलापोटी अडीच कोटींचे बिल देते. शहरातील पाणीगळती, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, जलकुंभ न भरणे, अनियमित पाणीपुरवठा आदींमुळे शहरातील अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मराठा सेक्शन परिसरातील नागरिक, मनसे गेल्या आठवड्यात रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.

पाणीटंचाईने नागरिक ऐन दिवाळीत त्रस्त असताना महापालिकेने एप्रिलपासून पाणीबिल दिले नसल्याचे उघड झाले आहे. पाणीबिल वेळेत व नियमित दिले जात नसल्याने एमआयडीसी कधी व केव्हाही पाणीकपात करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून एलबीटी अनुदानाव्यतिरिक्त अन्य उत्पन्नाचे स्रोत ठप्प पडले आहे.

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी.एम. सोनवणे यांना एमआयडीसीचे पाणीबिल दिले की नाही, याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिल्याने, विभागाचे काम रामभरोसे सुरू असल्याची टीका होत आहे. मुख्य लेखा अधिकारी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पाण्याचे बिल एप्रिलपासून दिले नसल्याची माहिती दिली. तसेच कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस दिल्यानंतर पगार देणार असल्याचे संकेत दिले. लॉकडाऊन कालावधीतील सात महिन्यांत मालमत्ता व पाणीपुरवठाकर विभागातून पाच कोटींपेक्षा कमी उत्पन्न मिळाले. तसेच नगररचनाकार विभागाला नगररचनाकार मिळाल्यानंतरही उत्पन्न ठप्प असून इतर विभागाची स्थिती जैसे थे आहे.

Web Title: Water shortage in Ain Diwali in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.