जलवाहिनी वाहून गेल्याने आसनगावमध्ये पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:47 AM2021-09-14T04:47:42+5:302021-09-14T04:47:42+5:30
आसनगाव : आसनगाव ग्रामपंचायतीकडून पिण्याचा पाणीपुरवठा करणारी सापगाव जॅकवेल येथून येणारी जलवाहिनी मुसळधार पावसामुळे भारंगी नदीत वाहून गेली आहे. ...
आसनगाव : आसनगाव ग्रामपंचायतीकडून पिण्याचा पाणीपुरवठा करणारी सापगाव जॅकवेल येथून येणारी जलवाहिनी मुसळधार पावसामुळे भारंगी नदीत वाहून गेली आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात चार-पाच दिवसांपासून नागरिकांना पाण्याची टंचाई सहन करावी लागत आहे.
यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे पाण्याची चिंता मिटेल, असे ग्रामस्थांना वाटत आसतानाच आसनगाव ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा करणारी सापगाव जॅकवेल येथील जलवाहिनी दुसऱ्यांदा वाहून गेली आहे. ग्रामपंचायतीतर्फे तात्पुरती दुरुस्ती करून हजारोंचा खर्च केला जातो. मात्र, कायमस्वरूपी उपाय केला जात नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. आसनगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गाव पट्टा (जुने गाव), संभाजीनगर, शिवांजलीनगर, गावदेवीनगर, कातकरी वाडी, तुळजाईनगर, दिघेनगर, ठक्कर कम्पाउंड, ग्रीन विव्ह पार्क बिल्डिंग, विहिरीचा पाडा, सावंत पार्क, नरेन मोनिषा अपार्टमेंट, तुलसी विहार, पंचशीलनगर, उमवणे पाडा, दत्तगुरूनगर, सावरोली, पळस पाडा, शिवाजीनगर, मुंढे वाडी, साई मंदिर, आदर्शनगर, तास पाडा, शिऱ्याचा पाडा आणि रोज गार्डन तर निर्मलनगर कोंडेपाडा, निर्मलनगर, गोकुळसृष्टी, संघवी पॅरेडाइज आदी ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो.
सध्या आसनगाव शहराची लाेकसंख्या झपाट्याने वाढत असून त्यांना पाणीपुरवठा करता तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात संभाजीनगर, ठक्कर कम्पाउंड, शिवांजलीनगर, तुळसी विहार या ठिकाणी नेहमीच ग्रामपंचायतीकडून कमी प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. काही वर्षांपासून आसनगाव परिसरातील अनेक विभागांत अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे.
काेट
नदीच्या प्रवाहात एक मोठा लाकडी ओंडका जलवाहिनीला धडकला. त्यामुळे जलवाहिनी फुटली आहे. एकदा ती जोडली होती; पण लिकेज राहिल्यामुळे पाणी कमी प्रमाणात येत आहे. लवकरच आसनगावातील पाणीपुरवठा सुरळीत करू.
- अरुण मडके, प्रशासक, ग्रामपंचायत आसनगाव
अनेक वर्षांपासून आसनगावातील पाण्याची समस्या कायम आहे. पाणीटंचाईवर ठोस उपाययोजनेची गरज आहे. मात्र, किरकोळ खर्च करून शासनाच्या पैशाचा गैरवापर सुरू आहे. तो थांबला तरच पाणीपुरवठा सुरळीत होईन.
- संतोष सोनारे, ग्रामस्थ