बारकूपाडा भागात महिन्याभरापासून पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:40 AM2021-03-20T04:40:36+5:302021-03-20T04:40:36+5:30

अंबरनाथ : पालिका निवडणूक तोंडावर असताना आता पाण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अंबरनाथच्या बारकूपाडा भागात नागरिकांना आपल्याकडे वळविण्यासाठी इच्छुक ...

Water shortage in Barkupada area for a month | बारकूपाडा भागात महिन्याभरापासून पाणीटंचाई

बारकूपाडा भागात महिन्याभरापासून पाणीटंचाई

Next

अंबरनाथ : पालिका निवडणूक तोंडावर असताना आता पाण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अंबरनाथच्या बारकूपाडा भागात नागरिकांना आपल्याकडे वळविण्यासाठी इच्छुक उमेदवार स्वतः पाणीपुरवठा बंद करून नंतर तो पुन्हा सुरू करीत आहेत. आपण पाण्याची समस्या सोडवली हे दाखविण्यासाठी इच्छुक उमेदवार हा प्रयत्न करीत आहेत. या राजकीय खेळीमुळे स्थानिक नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.

गेल्या आठवडाभरापासून अंबरनाथ शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एमआयडीसीकडून जीवन प्राधिकरणाला जो पाणीपुरवठा केला जातो त्यात काही प्रमाणात कपात झाल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, आता पाणीटंचाईला केवळ जीवन प्राधिकरण किंवा एमआयडीसी जबाबदार राहिले नसून आता राजकीय हस्तक्षेपामुळेही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, अंबरनाथमधील बारकूपाडा गाव. या गावात गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे. ही पाणीटंचाई राजकीय दबदबा निर्माण करण्यासाठी होत असल्याचा आरोप केला जात आहे. शहरात निवडणुकीचे वातावरण असल्याने नागरिकांना आपल्याकडे वळविण्यासाठी इच्छुक उमेदवार विविध क्लृप्त्या लढवत आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉल्वमनला हाताशी धरून काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे, असा आरोप खुद्द माजी नगरसेविका अनिता भोईर यांनी केला आहे. एखाद्या विभागामध्ये इच्छुक उमेदवारांना हवा तसा प्रतिसाद न मिळाल्यास ते इच्छुक त्या भागातील नागरिकांना अप्रत्यक्ष त्रास देण्याचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

------------------------------------

कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी

निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुक उमेदवारांनी निर्माण केलेली ही पाणीटंचाई नागरिकांना मात्र त्रासदायक ठरली आहे. बारकूपाडामधील या पाणीटंचाईच्या विरोधात स्थानिक महिलांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. पाण्याची ही परिस्थिती केवळ बारकूपाडापुरती मर्यादित नसून शिवगंगानगर भागातही निर्माण झाली आहे. या कृत्रिम पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

Web Title: Water shortage in Barkupada area for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.