उल्हासनगरातील संतोषनगर परिसरात पाणीटंचाई, ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार गेले कुठे?
By सदानंद नाईक | Published: October 17, 2023 05:26 PM2023-10-17T17:26:52+5:302023-10-17T17:27:13+5:30
उल्हासनगरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने गेल्या काही वर्षांपूर्वी ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना रावबिली.
उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील संतोषनगर, महादेवनगर आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण होऊन जलकुंभातून पाणी सोडण्यासाठी ठेवलेले वॉलमन गेले कुठे? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हासमन्वयक धनंजय बोडारे यांनी केला. शहरात विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी पुरवठा विभागात ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार ठेवण्यात आले.
उल्हासनगरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने गेल्या काही वर्षांपूर्वी ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना रावबिली. योजने अंतर्गत मुख्य जलवाहिन्या नवीन टाकण्यात येऊन ११ उंच जलकुंभ व एक भूमिगत जलकुंभ उभारण्यात आले. तसेच बुस्टर पंपिंग स्टेशनसह उभारण्यात आले. मात्र त्यानंतरही शहरात पाणी टंचाई जैसे थे आहे. पुन्हा पाणी पुरवठा योजने अंतर्गत १२५ कोटीचा निधी शासनाने दिला आहे. कोट्यवधीच्या निधीचा उपयोग करूनही पाणी टंचाई जैसे थे आहे. महापालिकेने पाणी वितरणातील दोष जाहीर करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी उपायुक्त सुभाष जाधव यांच्याकडे केली आहे.
शहरातील कॅम्प नं-४, संतोषनगर, ओटी सेक्शन, महादेवनगर आदी परिसरात गेल्या १५ दिवसापासून पाणी टंचाई निर्माण झाली. याबाबत पाणी पुरवठा विभागाला तक्रारी केल्या असता, जलकुंभाचा पाणी सोडण्याचा वॉल खराब झाल्याचे सांगण्यात आले. मात्र वॉल बदलण्यासाठी १० दिवसाचा वेळ विभागाला लागल्याची टीका बोडारे यांनी केली. महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्याने असे प्रकार घडत असल्याचे उपायुक्त जाधव यांचे म्हणणे आहे. विभागात वॉलमन, दुरुस्तीसाठी कामगार, पाणी सोडण्यासाठी घेतलेले कामगार असे ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार गेले कुठे? असा प्रश्न बोडारे यांनी उपायुक्त जाधव यांना केला. तसेच पाणी पुरवठा विभागाचा पदभार एका कनिष्ठ अभियंताकडे असून विभागाचे काम करण्यासाठी कंत्राटी अभियंता घेतले आहे. त्यांना या विभागाबाबत काहीएक माहिती नसल्याचा आरोपही बोडारे यांनी केला.
चौकट
आमदारांनी केला होता अपशब्दाचा वापर
पाणी टंचाई बाबत गेल्या महिन्यात आमदार गणपत गायकवाड यांनी एमएमआरडीए, महावितरण व महापालिका अधिकाऱ्यांची आयुक्त कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीत आमदारांनी पाणी पुरवठा अभियंता यांच्या बाबत अपशब्द वापरल्यानंतर वाद झाला होता.