उल्हासनगरातील सुभाष टेकडी भागात पाणीटंचाई
By सदानंद नाईक | Published: June 14, 2024 05:20 PM2024-06-14T17:20:11+5:302024-06-14T17:20:58+5:30
उल्हासनगरात उच्चभु परिसरात मुबलक तर झोपडपट्टी भागात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप नेहमीचा झाला. मात्र महापालिका यावर निश्चित तोडगा काढत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
उल्हासनगर : कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरातील दहाचाळ, डिफेन्स कॉलनी, महात्माफुले कॉलनी, नालंदा शाळापरिसर, भिमशक्तीनगर, आम्रपालीनगर, पंचशीलनगर, साईबाबानगर, कानसई रोड, भारतनगर, राजपूत लाईन आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली. पाणी द्या त्यानंतरच पाणी बिल पाठवा, असा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला मनसेने याबाबत आयुक्त अजीज शेख यांना निवेदन दिले आहे.
उल्हासनगरात उच्चभु परिसरात मुबलक तर झोपडपट्टी भागात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप नेहमीचा झाला. मात्र महापालिका यावर निश्चित तोडगा काढत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कॅम्प नं-४, सुभाष टेकडी नेहमी पाणीटंचाईग्रस्त परिसर राहिला आहे. सुरवातीला अनियमित व कधीही पाणी पुरवठा होत होता. तर काही दिवसांपासून मध्यरात्री अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. असा आरोप स्थानिकांनी केला असून मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे यांनी याबाबत आवाज उठवून महापालिका आयुक्त अजीज शेख यांना निवेदन दिले. तसेच खडी मशीनपासून कुर्ला कॅम्प जलकुंभापर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेने नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी निश्चित पाणी योजना राबविण्याची मागणी होत आहे. अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे, उंच जलकुंभ बांधले. मात्र त्याचा पुरेसा उपयोग होत नाही. आयुक्त अजीज शेख यांना मनसेचे अध्यक्ष अध्यक्ष बंडू देशमुख, शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी पाणी टंचाई बाबत निवेदन दिले. यावेळी सचिन बेंडके, शैलेश पांडव, अक्षय धोत्रे, प्रकाश कारंडे, सुहास बनसोडे यांच्यासह सुनील रोहिडा, अमित सिंग, विक्की जिप्पसन, सचिन सिरसाठ, रमेश जाधव इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.