Ulhasnagar: उल्हासनगरात पाणी टंचाई, नागरिक त्रस्त, जलवाहिनी आणि जलकुंभाला गळती
By सदानंद नाईक | Published: June 13, 2023 07:58 PM2023-06-13T19:58:17+5:302023-06-13T19:58:48+5:30
Water shortage in Ulhasnagar:
- सदानंद नाईक
उल्हासनगर - शहरातून बारामाही वाहणारी उल्हास नदी असूनही महापालिकेची स्वतःची पाणी पुरवठा योजना नाही. पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत असून शहरातील बहुतांश ठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्न उभा ठाकला आहे.
उल्हासनगरच्या हद्दीतून वाहणाऱ्या उल्हास नदीवर संच्युरी कंपनीची स्वतःची पाणी पुरवठा योजना आहे. तसेच नदी पात्रातून एमआयडीसी पाणी उचलून शहराला पाणी पुरवठा करीत आहेत. शहराला मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी उल्हास नदीवरील पाणी पुरवठा योजना उल्हासनगर महापालिकेला हस्तांतरण करण्याची मागणी जुनी आहे. दरम्यान या प्रक्रियेला गती आली होती. मात्र नंतर ही योजना रेंगाळली आहे. तर शहर पूर्वेला एमआयडीसीच्या पालेगाव जलकुंभातून व जलवाहिनीतून पाणी पुरवठा होतो. दरम्यान महापालिकेने ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजने अंतर्गत ११ नवीन जलकुंभ, एक भूमिगत जलकुंभ, पंपिंग स्टेशन उभारले आहे. त्याच बरोबर ५५ हजार पाणी मीटर बसविण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र ५५ हजार पाणी मीटर गेले कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शहरातील सुभाष टेकडी परिसरातील नागसेननगर, आम्रपालीनगर, साईनगर, महात्मा फुले कॉलनी, कुर्ला कॅम्प परिसर, संतोषनगर, महादेवनगर, गायकवाड पाडा, गणेशनगर, ज्योती कॉलनी, राहुलनगर, शांतीनगर, इमली पाडा आदी ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असून महिलांनी दोन दिवसांपूर्वी थेट पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक दिली होती. पाणी पुरवठा विभागाचे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकारी अभियंता पद रिक्त असून विभागात बहुतांश पदे प्रभारी आहेत. त्यामुळे विभागात सावळागोंधळ उडाल्याचे चित्र आहे. नव्याने हातपंप खोदणे व हातपंप दुरुस्तीवर दरवर्षी लाखोचा खर्च करूनही ३० टक्के पाणी गळती कायम आहे. तसे महापालिका अधिकारीच जाहीरपणे सांगत आहेत. एकूणच पाणी पुरवठा विभागाला सक्षम अधिकारी व कार्यकारी अभियंता पदाची गरज आहे. विभागात २५० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करीत आहेत. मात्र कोणत्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत काम करतात. हा संशोधनाचा विषय झाला आहे.
राजकीय नेत्यांनी बघायची भूमिका
महापालिका निवडणुका येताच भावी नगरसेवकात वाढ होऊन नागरिकांचे कामे करतात. मात्र महापालिका निवडणूक लांबणीवर पडल्याने, माजी नगरसेवकासह भावी नगरसेवकही आज पाहायला मिळत नसल्याने, नागरिकांचे पाणी टंचाई प्रश्न तसाच टांगलेला आहे.