बेकायदा बांधकामांमुळे केडीएमसीमध्ये पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:36 AM2018-10-20T00:36:57+5:302018-10-20T00:37:03+5:30
केडीएमसीची महासभा : विरोधक, सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर हल्लाबोल
कल्याण: बेकायदा बांधकामधारक केडीएमसी हद्दीतील करदात्यांचे पाणी पळवत आहेत. त्यामुळे पाणीटंचाई भेडसावत आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्ष मनसेने शुक्रवारी महासभेत केला. यावेळी पाणीप्रश्नावरून विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही प्रशासनावर हल्लाबोल केला. अखेर, पाणीप्रश्नावर सोमवारी बैठक होणार आहे, असे महापौर विनीता राणे यांनी स्पष्ट केले.
शहरातील बेकायदा बांधकामप्रकरणी निलंबित असलेले अतिरिक्त आयुक्त संजय घरत, उपायुक्त सु.रा. पवार व प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांच्यावर कारवाई करण्यास प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. बेकायदा बांधकामे तोडली जात नाहीत. अधिकाºयांवर कारवाई नाही. बेकायदा बांधकामे करदात्यांच्या तोंडचे पाणी पळवत असल्याने महापालिका हद्दीत पाणीटंचाई आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी केला.
बेकायदा चाळीतील एका घराला महिन्याला १०० रुपये आकारून पाणी पुरवले जाते, असे सत्ताधारी नगरसेविका माधुरी काळे यांनी सांगितले. पूर्वेतील पाणीसमस्या सुटलेली नाही. पश्चिमेतील शिवसेनेचे नगरसेवक जयवंत भोईर, हर्षला थवील, छाया वाघमारे यांनीही आपल्या प्रभागात पाणी येत नाही. त्यावर प्रशासन तोडगा काढत नाही, याकडे लक्ष वेधले. माझ्या प्रभागात पाण्याच्या दोन टाक्या आहेत. मात्र, त्यात पाणीच नाही, असे भोईर म्हणाले. पिसवली येथील नगरसेविका सुनीता खंडागळे यांनीही पाण्याचा प्रश्न बिकट असल्याचे सांगितले.
नगरसेवक वामन म्हात्रे म्हणाले, कल्याण पूर्व व अन्य ठिकाणी २५ हजारांपेक्षा जास्त बेकायदा नळजोडण्यांद्वारे पाणीचोरी होत आहे. त्यामुळे करदात्यांना पाणी मिळत नाही. तर, शिवसेना नगरसेविका शालिनी वायले म्हणाल्या, पाण्यासंदर्भात बुधवारी बैठक होऊन काहीच उपयोग झाला नाही. आजही प्रभागात पाणी आलेले नाही. भाजपा नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी मागील वर्षी २७ गावांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाच कोटींची कामे करण्यात आली. तरीही, समस्या कायम आहे. पाणीटंचाई असताना आता २२ टक्के कपात लागू झाली आहे. त्यामुळे टंचाईची समस्या अधिक तीव्र होणार आहे.
सदस्य बैठकीला गैरहजर, महापौरांचा चढला पारा
पाणीप्रश्नावर बुधवारी आयुक्तांकडे झालेल्या बैठकीला प्रत्येक नगरसेवकाने उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र, तेथे अनेकांनी पाठ फिरवली. सभेत पटलावर विषय नसताना हा विषय घेतला जातो. सगळ्यांनी शांत बसा, या प्रश्नावर पुन्हा बैठक घेऊ. काळे या बैठकीला आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी तर सभागृहाचा वेळ अजिबात घेऊ नये. त्यावर आयुक्तांनी खुलासा करावा. तसेच पाणीप्रश्नावर पुन्हा सोमवारी बैठक घेतली जाईल, असे राणे यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱयांची भरती करा
महापालिकेत अधिकाऱयांची कमतरता आहे. काही जण निवृत्त झाले आहेत. काही निवृत्तीच्या मार्गावर आहे. तर, काही अधिकारी काम करत नाही. त्यामुळे अधिकाऱयांची भरती झाली पाहिजे. तरच, समस्यावर तोडगा काढणे शक्य होईल, अशी सूचना शिवसेना सदस्य रमेश म्हात्रे यांनी केली.
पाण्याची पातळी राखण्यासाठी उपाययोजना
पाटबंधारे खात्याकडून २२ टक्के पाणीकपात लागू झाली आहे. कल्याण पूर्वेतील पाणीप्रश्नावर बुधवारी बैठक घेतली. तसेच ‘महावितरण’च्या अधिकाºयांशी शुक्रवारी बैठक घेतली. मोहने व मोहिली येथील नदीपात्रातील पाण्याची पातळी कशी राखली जाईल, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, असा खुलासा आयुक्त गोविंद बोडके यांनी केला.