पेंढरघोळ गावाची पाणीटंचाई झाली दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:23+5:302021-03-14T04:35:23+5:30
भातसानगर : शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारी पाणीटंचाई दूर झाली आहे. येथे नव्याने १९ लाख ...
भातसानगर : शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारी पाणीटंचाई दूर झाली आहे. येथे नव्याने १९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या जलकुंभातून शुक्रवारपासून पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली. ‘लोकमत’ने यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत आटगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्कर बरोरा, विद्यमान कृषी पशुसंवर्धन सभापती संजय निमसे, सरपंच पद्मावती बरोरा, उपसरपंच राजेंद्र निमसे यांनी पाठपुरावा करून ही योजना राबविण्यात यश मिळविले आहे.
पेंढरघोळ या ९५० लोकसंख्या असणाऱ्या गावाला अनेक वर्षे पाणीटंचाई जाणवत होती. मात्र सरपंच, उपसरपंच यांनी सातत्याने पाठपुरावा करून १९ लाख रुपये खर्च करून जलकुंभ बांधला. या पाड्याला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या सभापती सुषमा लोणे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय निमसे, सभापती रेश्मा मेमाणे, उपसभापती जगन्नाथ पस्टे, पुरुषोत्तम भेरे, अरुण शेलार यांनी जलकुंभ बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते खंडू बरोरा तसेच ग्रामविकास अधिकारी संजय सावंत यांच्या उपस्थितीत गावाला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. कंत्राटदार राजेश विशे, दत्ता चाळके यांनी विशेष प्रयत्न करून हा पाणीपुरवठा सुरळीत केल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले.
भावली धरणातून शहापूर तालुक्याला पाणीपुरवठा झाला तर शहापूर तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, असे पांडुरंग बरोरा यांनी सांगितले. शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई कायमची दूर व्हावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांनी या वेळी सांगितले