उल्हासनगरात शुक्रवार आणि शनिवारी पाणी बंद; नागरिकांनो पाणी जपून वापरण्याचे आवाहन
By सदानंद नाईक | Published: October 11, 2023 07:45 PM2023-10-11T19:45:34+5:302023-10-11T19:46:35+5:30
उल्हासनगर पश्चिमला एमआयडीसीच्या शहाड जलकुंभातून पाणी पुरवठा होतो.
उल्हासनगर : शहर पश्चिमेला पाणी पुरवठा होणाऱ्या एमआयडीसीच्या शहाड पंप हाऊस मधील जुन्या साठवण टाकीच्या हेडर व मॅनिफोल्ड बदलण्याचे व दुरुस्तीचे काम शुक्रवार व शनिवारी सुरू राहणार असल्यामुळे दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यादरम्यान साठवण टाकीतून मर्यादित स्वरूपात पाणी पुरवठा होणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याची आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे.
उल्हासनगर पश्चिमला एमआयडीसीच्या शहाड जलकुंभातून पाणी पुरवठा होतो. शहाड पाणी पुरवठा पम्पिंगचे जूने हेडर व मॅनिफोल्ड बदलून नविन टाकणे, जुनी जीर्ण जलवाहीनीच्या जागी नविन वाहीनी जोडणे, नळजोडण्या स्थलांतरीत करणे व इतर संबंधित कामांचा समावेश आहे. या कामांसाठी ३० तासांचा कालावधी लागणार असल्याने, शुक्रवारी व शनिवार असे दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या दरम्यान नविन पाणी साठवण टाकीमधून मर्यादित स्वरुपाचा पाणी पुरवठा सुरु राहील. नागरिकांनी पाणी पुरवठा बंद होण्यापुर्वी, मुबलक पाणी साठा करून ठेवावा. असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.