ठाण्यात मतदारराजावर ‘बदाबदा’, पाणीकपात सहा तासांनी केली कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 04:44 AM2019-03-31T04:44:23+5:302019-03-31T04:44:53+5:30
महापालिकेचा निर्णय : पाणीकपात सहा तासांनी केली कमी
ठाणे : लोकसभा निवडणुकीची चौथ्या टप्प्यातील मतदानाची अधिसूचना दोन दिवसांनी जारी होत असतानाच ठाणे महापालिकेने स्टेम आणि स्वत:च्या योजनेतून केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातील कपात ही ३० तासांवरून २४ तासांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांना दिलासा मिळणार आहे. तसेच कळव्याच्या काही भागांतही यामुळे पाणीकपात थोड्या प्रमाणात कमी होणार आहे.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हा निर्णय घेतल्यामुळे ठाणेकरांना ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळणार आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाल्याने त्याचा परिणाम म्हणून नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत पाणीकपात सुरू झाली आहे. सुरुवातीला ही कपात १२ तासांची होती, त्यानंतर त्यात वाढ होऊन ती ३० तासांपर्यंत केली. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच ठाणेकरांना पाणीकपातीच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत होत्या. ३० तासांच्या पाणीकपातीमुळे शहरासह कळवा, मुंब्य्रातील अनेक उंचावरील भागांना पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतरही पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ठाणेकर चांगलेच मेटाकुटीला आले आहेत.
ठाणेकरांची ही संतापाची भावना लक्षात घेऊन आणि लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ठाणे मतदारसंघातील निवडणुकीची धामधूम सुरू होत असल्याने ठाणे महापालिकेने आता पाणीकपात कमी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ठाणे शहराला आजघडीला ४८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे.
महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील नौपाडा, कोपरी, माजिवडा, घोडबंदर, वागळे इस्टेट, किसननगर, रायलादेवी आदींसह कळव्यातील काही भागांना दिलासा मिळणार आहे.
दुसरीकडे एमआयडीसीचा पाणीपुरवठा हा कळव्याचा काही भाग, मुंब्रा आणि दिवा येथे होत आहे. परंतु, या भागात ३० तासांची पाणीकपात कायम राहणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. येथील पाणीकपात २४ तासांवर आणण्यासाठी एमआयडीसीला पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. परंतु, अद्याप त्यांच्याकडून अपेक्षित असे सहकार्य मिळू शकलेले नाही.
मतदान होताच कपात वाढणार? : ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर या भागातील पाणीकपात वाढवली जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत यापूर्वी दिले गेले आहेत. त्यामुळे सध्याचा दिलासा हा तात्पुरता असून त्यानंतर पुन्हा अधिक तीव्र टंचाईचा सामना करावा लागणार आहे.