कल्याणमध्ये ठिकठिकाणी पाणी : नालेसफाईचा दावा गेला वाहून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 12:54 AM2019-06-29T00:54:18+5:302019-06-29T00:54:35+5:30
मोसमी पावसाने गुरुवारपासून कल्याण-डोंबिवली शहरांत दमदार हजेरी लावली. शुक्रवार सायंकाळपर्यंत ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
कल्याण : मोसमी पावसाने गुरुवारपासून कल्याण-डोंबिवली शहरांत दमदार हजेरी लावली. शुक्रवार सायंकाळपर्यंत ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महापालिका हद्दीत १३ झाडे तसेच विजेचा एक खांब पडला. पूर्वेतील कर्पेवाडीतील तीन मजली नायर इमारतीच्या जिन्याचा भाग पावसामुळे कोसळला. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने केडीएमसीचा नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. पूर्वेतील लोकग्रामचा नवा रस्ता शुक्रवारी खचल्याने त्यात शालेय बसचे चाक रुतले. बसमध्ये विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला असला, तरी महापालिकेने तयार केलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा होता, हे यामुळे उघड झाले आहे.
शहरात महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याण-आग्रा रोडवरील ‘जय हरी’ ही अतिधोकादायक इमारत पोकलेन व जेसीबीद्वारे भरपावसात जमीनदोस्त करण्याचे काम प्रभाग अधिकारी भरत पवार यांच्या पथकाने केले. महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी शहरांमध्ये ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा आढावा घेत सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना तेथे तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच मोठ्या नाल्यांची पाहणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अग्निशमन दल व आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी पडलेली झाडे हटवली.
ओंकार शाळेची बस विद्यार्थ्यांना सोडून परतत असताना लोकग्रामकडे जाणाºया रस्त्यावर तिचे चाक रुतले. बसचालकाने वेळीच प्रसंगावधान राखून गाडी थांबवली. नागरिक व चालकाने बस बाहेर काढली. पावसामुळे रस्ता खचला असला, तरी महापालिकेने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले होते. त्यामुळे ही घटना सकाळी घडली. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी हेमंत गुप्ते यांनी सांगितले की, बसमध्ये विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला. अन्यथा, बसला अपघात होण्याची शक्यता होती. रस्ता खचल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच महापालिकेच्या बांधकाम विभागाने धाव घेत हा रस्ता पूर्ववत करण्यासाठी तेथे खडी टाकण्याचे काम भरपावसात हाती घेतले गेले. या प्रकारची तत्परता अन्य घटनांमध्येही महापालिका प्रशासनाकडून दाखवली जावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कल्याण पूर्वेतील चक्कीनाका ते नेवाळीदरम्यान मलंग रोडचे काम सुरू आहे. सध्या रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असले, तरी अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटारे मुख्य नाल्याशी जोडली गेलेली नाहीत. त्यामुळे हा रस्ता पावसामुळे पाण्याखाली गेला होता. तर, पश्चिमेतील एव्हरेस्ट कॉलनी, हीना पार्क, चिकणघर, राम मंदिर या परिसरात पावसाचे पाणी तुंबले होते. पाणी तुंबू नये, यासाठी स्थानिक कार्यकर्ते चेतन मामूलकर यांनी जेसीबी आणून नाले स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला होता. तरीदेखील पावसाचे पाणी या परिसरात साचले. महापालिकेने योग्य प्रकारे नालेसफाई केली नसल्याने हा फटका बसल्याची तक्रार मामूलकर यांनी केली आहे. त्याचबरोबर शिवाजी चौक व महंमद अली चौकात पाणी साचले. हे दोन्ही चौक सखल भागांत असल्याने दरवर्षी येथे पाणी साचते. तरीही, महापालिका त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढत नाही, याकडे पादचाºयांनी लक्ष वेधले आहे.
ठाकुर्ली पूर्वेला रेल्वेस्थानकातील फाटक बंद करून तेथे रेल्वे प्रशासनाने मोठी भिंत बांधली आहे. तेथे रस्त्याचा उतार असल्याने पावसाचे वाहून येणारे पाणी जाण्यासाठी जागाच नसल्याने पाणी साचले होते. त्यातूनच नोकरदार, विद्यार्थी तसेच वाहनचालकांना येजा करावी लागली. पाणी तुंबल्याचे कळताच मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश मोरे, गटनेते मंदार हळबे व रहिवासी धनंजय चाळके यांनी तेथे धाव घेतली. प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांना तेथे बोलवून तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्पुरती व्यवस्था केली. भिंत रेल्वेच्या हद्दीत असल्याने महापालिका तेथे काम करू शकत नाही. हा त्रास आता दरवर्षी पावसाळ्यात होणार आहे.
त्यामुळे त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी मनसेने केली आहे.
टिटवाळा, बल्याणीत घरांमध्ये पाणी
टिटवाळा : कल्याण तालुका आणि टिटवाळा परिसरातही गुरुवारपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. केडीएमसी हद्दीतील टिटवाळा, आंबिवली, बल्याणी, अटाळी येथे शुक्रवारी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. टिटवाळा येथील निमकरनाका, सावरकरनगर येथे अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी तेथील रहिवाशांच्या घरांत शिरले. त्यामुळे त्यांची गैरसोय झाली.
शहरातील आनंद दिघे मार्ग येथील नितीन गोसावी म्हणाले की, ‘रस्त्यांची कामे करताना त्यांची उंची वाढवण्यात आली आहे. त्यामुळे घरे खाली गेली आहेत. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी प्रशासनाने नियोजन केलेले नाही. परिणामी, घरांमध्ये पाणी शिरते. पश्चिमेला स्थानक परिसरातील रस्ता पाण्याखाली गेल्याने येथून येजा करणाºया नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागली.
बल्याणी येथील मोहिली रोडलगतच्या चाळीतील ५० घरांमध्ये पाणी शिरले होते. महापालिकेकडून योग्य प्रकारे नालेसफाई न झाल्याने हा प्रकार घडल्याचे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच दोन दिवसांपासून तेथील वीजपुरवठा खंडित झाला आहे, अशी माहिती रहिवासी संतोष दळवी यांनी दिली. ट्रान्सफॉर्मरची क्षमता आणि वीजजोडण्या अधिक असल्याने वीज खंडित झाल्याचे ते म्हणाले.
आंबिवली-मोहने येथे पोलीस ठाण्याकडे जाणाºया मार्गावरही पाणी साचल्याने त्यातून विद्यार्थी-महिलांना वाट काढावी लागली. पावसाच्या आगमनामुळे बळीराजा कमालीचा सुखावला आहे. फळेगाव, रायता, रुंदे, घोटसई, गोवेली आदी परिसरांत उखळण, नांगरणी अशी कामे सुरू झाली आहेत. दुसरीकडे नद्या, ओढ्यांच्या प्रवाहाबरोबर येणारे मासे पकडण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
भ्रष्टाचाराचा आरोप
पावसाळा लांबल्याने नालेसफाई करण्यास महापालिकेस उसंत होती. मात्र,त्याचा फायदा प्रशासनाला घेता आलेला नाही. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले. नालेसफाईवर खर्च झालेले कोट्यवधी रुपये वाया गेल्याने या कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाहणीकरिता दौैरा करा, अशी मागणी आयुक्त गोविंद बोडके व सत्ताधारी पक्षाकडे केली होती. मात्र, त्याचा विचार कोणीच केला नाही. हा विषयदेखील मनसेला महासभेत घेऊ दिला नाही, याकडे मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी लक्ष वेधले आहे.