निवडणूक कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:03 AM2019-05-03T01:03:43+5:302019-05-03T01:04:32+5:30
जेवण मिळाले पण पिण्यास पाणी नाही : ग्रामीण भागातील विदारक परिस्थिती
ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी व कल्याण या लोकसभा मतदारसंघांची बहुतांशी मतदानकेंद्रे ग्रामीण व दुर्गम भागांतील गावखेड्यांत होते. जेवण मिळेल पण पाणी नाही, असे स्पष्ट शब्दांत येथील गावकऱ्यांनी मतदानकेंद्रांवरील अधिकारी, कर्मचाºयांना सुनावल्याचे सांगितले जात आहे. यामुळे एक रात्र काढल्यानंतर मतदानाच्या दिवशी मात्र सकाळीदेखील या अधिकारी-कर्मचाºयांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागल्याचे त्यांनी ठाण्यात परतल्यानंतर लोकमतला सांगितले.
जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान झाले. यासाठी सहा हजार ७१५ मतदानकेंदे्र होती. यातील एक हजार १३६ मतदानकेंदे्र ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागांमधील गावखेड्यांत होती. येथील बहुतांशी मतदानकेंद्रांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावत असताना पाणीसमस्येलादेखील तोंड द्यावे लागले. पाणीसमस्येची भीषणता या कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचाºयांना जाणवल्यामुळे पाण्याचे महत्त्वही त्यांच्या लक्षात आले. गावाजवळील धरणाचे पाणीदेखील त्यांना मिळत नसल्याचे वास्तव गावकऱ्यांकडून समजले.
भिवंडी लोकसभेच्या दोन हजार २०० मतदान केंद्रांपैकी एक हजार १७७ केंद्रे शहरात, तर उर्वरित एक हजार २३ मतदानकेंद्रे ग्रामीण भागात होती.