पाणी परिषदेत वादाचा ‘खळखळाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:49 PM2019-06-10T23:49:17+5:302019-06-10T23:49:49+5:30

राष्ट्रवादीतील वाद संपता संपेना : वक्त्यांसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

Water Summit Controversy in kalyan | पाणी परिषदेत वादाचा ‘खळखळाट’

पाणी परिषदेत वादाचा ‘खळखळाट’

Next

कल्याण : लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवानंतरही राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील वाद काही संपण्याची चिन्हे नाहीत. त्याची प्रचीती सोमवारी पाणी परिषदेच्या निमित्ताने पुन्हा आली. पाणी या प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलेल्या वक्त्यांसमोरच राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते आणि पक्षाचे वक्ता प्रशिक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज नायर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर दोघांमधील वाद शमला. परंतु, पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोलवलेल्या कार्यक्रमात वरिष्ठ आणि वक्त्यांसमोर झालेला वाद चर्चेचा विषय बनला आहे.

अंंतर्गत गटबाजी आणि वाद हे समीकरण कल्याणमधील राष्ट्रवादीसाठी नवीन नाही. लोकसभेत झालेल्या पराभवामुळे आता तरी एकत्रित येत विधानसभा निवडणुकांना सामोरे जातील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होती. परंतु, सोमवारी घडलेला खडाजंगीचा प्रकार पाहता त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विसावा वर्धापन दिन सोमवारी सर्वत्र साजरा झाला. कल्याणमध्येही पक्षाने कल्याण-डोंबिवली जिल्ह्यातर्फे जलनियोजन संकल्प दिन कार्यक्रम आयोजित केला होता. सकाळी ध्वजारोहण, जलदिंडी आणि दुपारच्या सत्रात पाणी परिषद असे कार्यक्रमाचे नियोजन होते. प्रारंभी ध्वजारोहण झाल्यानंतर पक्षाचे कार्यालय असलेल्या वल्लीपीर रोडवरून जलदिंडी काढण्यात आली. नेहरू चौक, महंमद अली चौक, बाजारपेठ, शिवाजी चौक, बैलबाजार अशी मार्गस्थ होत पुन्हा वल्लीपीर रोडवरील मध्यवर्ती कार्यालय परिसरात दिंडीचा समारोप झाला. यावेळी दिंडीला प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे आदी उपस्थित होते. परंतु, दिंडीमध्ये मोजकेच स्थानिक पदाधिकारी सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
त्यानंतर पश्चिमेतील कल्याण रेल्वेस्थानकानजीक मोरया हॉलमध्ये पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पाण्याचे महत्त्व व नियोजन या विषयावर डॉ. गिरीश लटके, डॉ. मनोज वैद्य यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेसाठी पक्षातील विविध सेलचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, आजीमाजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सर्व जिल्हा, विधानसभा, प्रभाग, बुथ पदाधिकारी यांना निमंत्रित केले होते. परंतु, प्रत्यक्षात कार्यक्रमाला २० ते २५ जणच उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी आलेले पक्षाचे वक्ता प्रशिक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष नायर यांनी सभागृहातील नगण्य उपस्थिती तसेच पक्षाच्या स्थानिक पातळीवर झालेल्या वाताहतीबाबत बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बोलू दिले नाही. याबाबत, त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आमचीच तोंड बंद करा, असे बोल जिल्हाध्यक्ष हनुमंते यांना सुनावले. त्यावर पाणी परिषदेचा कार्यक्रम आहे. तुमच्या मुद्द्यांवर इतर वेळेलाही चर्चा होऊ शकते, असे हनुमंते यांनी नायर यांना सांगितले. परंतु, नायर यांनी तावातावाने बोलणे सुरूच ठेवले. त्यामुळे त्यांच्यात आणि हनुमंते यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली. परिषदेसाठी मार्गदर्शक म्हणून आलेले वक्ते लटके आणि वैद्य यांच्यासमोरच पदाधिकाºयांमधील खडाजंगी सुरू होती. अखेर, हिंदुराव यांनी नायर आणि हनुमंते यांना शांत राहण्यास सांगितले. तसेच लवकरच जिल्ह्याची बैठक बोलावू. त्यात तुम्ही तुमचे विषय मांडा, असे हिंदुराव यांनी स्पष्ट केल्यानंतर हा वाद शमला. त्यानंतर, पाणी परिषदेला सुरुवात झाली. परंतु, त्यापूर्वीच हिंदुराव आणि तपासे यांनी हॉलमधून काढता पाय घेतल्याचे दिसून आले.


नियोजन केल्यास पाणी मुबलक
च्आपल्याकडे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होतो. आपण जर पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले, तर पाणी अरब देशांना निर्यात करू शकतो, असे प्रतिपादन वक्ते डॉ. मनोज वैद्य यांनी केले. च्राज्यात मोठ्या प्रमाणावर धरणे आहेत. परंतु, गावात पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखे प्रयोग राबवले गेले पाहिजेत. प्रत्येक गावाने गावतळे संकल्पना पुढे आणली तर पाण्याच्या बाबतीत गावे समृद्ध होतील, असा विश्वासही वैद्य यांनी व्यक्त केला. तळ्यातील वाढत्या जलपर्णीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
च्डॉ. गिरीश लटके म्हणाले, नियोजन केले तर पाणी मुबलक आहे, पण आपली मानसिकताही महत्त्वाची आहे. इतिहासात मानवी वस्ती पाण्याजवळ वसली. माणूस पाण्याजवळ गेला, परंतु आज घराघरांमध्ये पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे. शेती, कारखानदारी या माध्यमातूनही पाण्याचा अतिउपसा होऊन पाणीसंकट ओढावले असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभेतील पराभवाबाबत प्रवक्त्यांनी सुनावले खडेबोल
कल्याण लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाबाबत प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी खडेबोल सुनावले. कल्याण मतदारसंघातील मुंब्रा-कळवा वगळता प्रत्येक मतदारसंघात घसरलेल्या मतांच्या टक्केवारीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आता विधानसभेसाठी सज्ज व्हा, कामाला लागा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

Web Title: Water Summit Controversy in kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.