चिखलोली धरणातून १० ऑक्टोबरपासून पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:38 AM2020-10-06T00:38:52+5:302020-10-06T00:38:56+5:30

मनसेचा पाठपुरावा; अंबरनाथ पूर्वेला दिलासा

Water supply from Chikhloli dam from 10th October | चिखलोली धरणातून १० ऑक्टोबरपासून पाणीपुरवठा

चिखलोली धरणातून १० ऑक्टोबरपासून पाणीपुरवठा

googlenewsNext

अंबरनाथ : अंबरनाथचे चिखलोली धरण भरून वाहत असतानाही त्या धरणाचा पाणीपुरवठा बंद करून ठेवण्यात आला होता. या धरणातून अंबरनाथ पूर्व भागाला पाणीपुरवठा व्हावा यासाठी मनसेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून १० आॅक्­टोबरपासून चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय जीवन प्राधिकरणाने घेतला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण पूर्णपणे भरलेले आहे. या धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा केला जात नव्हता. धरणाचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे मागील वर्षी पाणीपुरवठा राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हा पाणीपुरवठा थांबवण्यात आला होता. पर्यायी व्यवस्था म्हणून एमआयडीसीकडून अंबरनाथ शहराला पाणी मिळत असले, तरी ते पुरेसे नसल्याने अंबरनाथ शहराच्या पूर्व भागाला प्रामुख्याने मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १८ सप्टेंबरला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू झाल्यास अंबरनाथकरांना पुरेसे पाणी मिळेल, या हेतूने चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती. यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम देऊन त्यानंतर धरणात आंदोलनाचा इशारा मनसेने दिला होता. याची दखल घेत चिखलोली धरणातून होणारा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतला आहे. मात्र अनेक महिन्यांपासून चिखलोली धरणावरील जलशुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याने डागडुजीची गरज असून त्याला आणखी ४ ते ५ दिवस लागणार आहेत. त्यामुळे १० आॅक्टोबरपासून धरणातून होणारा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिले आहे.

...आंदोलन करणार!
लोकहितासाठी आणखी पाच दिवस आम्ही वाट बघणार असून त्यानंतर जर चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर १२ आॅक्टोबरला मनसे चिखलोली धरणात उतरून आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे आणि शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी दिला आहे.

Web Title: Water supply from Chikhloli dam from 10th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.