पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागील वर्षापेक्षा तिप्पट पाणीसाठा
By admin | Published: July 2, 2017 06:08 AM2017-07-02T06:08:33+5:302017-07-02T06:08:33+5:30
सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठ्यात तिप्पट वाढ झाली. बारवी धरणात मागील
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठ्यात तिप्पट वाढ झाली. बारवी धरणात मागील वर्षी आजच्या दिवशी केवळ ७ टक्के असलेला पाणीसाठा शनिवारी ४२.१४ टक्के झाला. भातसातही ४५.७३ टक्के, तर उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणातील पाणीसाठा ५ टककयावरून २५.७१ टक्के झाला आहे.
धरण क्षेत्रात पाच हजार ४२५ मिमी पाऊस आजवर पडला. सरासरी ७७५ मिमी त्याची नोंद असून मागील वर्षी ती केवळ ४०६ मिमी होती.
बारवीत ९८.२१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला. सुमारे ४२.१४ टक्के असलेला हा साठा मागील वर्षी केवळ ७.७ टक्के होता. भातसात मागील वर्षी २७.६५ टक्के असलेला साठा यंदा ४५.७३ टक्के आहे. उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात केवळ ५.४४ टक्के साठा होता, तो २५.७१ टक्के आहे. मोडक सागरमध्ये ९.९५ टक्के असलेला पाणीसाठा यंदा ४७.२२ टक्के झाला. तानसातही ४७ टक्के पाणी आहे. याशिवाय बदलापूर बंधाऱ्यातील १७ घनमीटर पाणीसाठ्यापैकी १४ घनमीटर तयार झाला. याप्रमाणेच मोहने बंधाऱ्यातही १० घनमीटरपैकी ५.८० घनमीटर पाणीसाठा तयार आहे. पहिल्याच पावसाने पाणीटंचाईच्या समस्येला दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.