आजाेबा पर्वतावर पाणपोईची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:45 AM2021-09-15T04:45:52+5:302021-09-15T04:45:52+5:30
भातसानगर : लाॅकडाऊनच्या काळात किन्हवली, डोळखांब परिसरातील काही तरुण भटकंतीसाठी आजोबा पर्वतावर गेले हाेते. तेथे पर्यटक व निसर्गप्रेमींना ...
भातसानगर : लाॅकडाऊनच्या काळात किन्हवली, डोळखांब परिसरातील काही तरुण भटकंतीसाठी आजोबा पर्वतावर गेले हाेते. तेथे पर्यटक व निसर्गप्रेमींना तसेच वन्य पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी योग्य सोय नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी स्वखर्चाने एक छोटीसी पाणपोई उभारण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी श्रमदानाचीही तयारी दर्शवली. त्यांच्या या उपक्रमाला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाणपोई उभारण्याअगोदर संवेदना ग्रुपच्या या तरुणांनी पर्वतावर श्रमदानाने एका पाझर तलावाची निर्मिती केली. ९० गोणी प्लास्टिकच्या बाॅटल व पाच गोणी मद्याच्या बाॅटल जमा करून त्यांची विल्हेवाट लावून संपूर्ण आजोबा पर्वताला ‘प्लास्टिक मुक्त’ केले.
संवेदना ग्रुपमधील तरुणांनी लोकसहभागातून संपूर्ण उन्हाळ्यात श्रमदानाने एक छोटेखानी पाणपोई उभी केली आहे. त्यामुळे महाशिवरात्री, सप्ताह व इतरही वेळी निश्चितच निसर्गप्रेमी व भाविकांना पाणपोईचा लाभ होईल. फावल्या वेळात तरुणांनी वेळेचा सदुपयोग करत परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून संवेदना ग्रुपचे कौतुक होत आहे. जिल्हा परिषद फंडातून पाणपोईसाठी तीन लाखांचा निधी मंजूर झाला आहे. संवेदना ग्रुपच्या पाणपोई उपक्रमामुळे शासनानेही आता आजोबा पर्वतावर विशेष लक्ष केंद्रित केल्याने तरुणांच्या उपक्रमाचेच हे यश आहे.
काेट
आम्ही राबवलेल्या या चांगल्या उपक्रमामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना पाणपोईमुळे पिण्याच्या पाण्यासाठी चांगली सोय झाली आहे. ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे.
- संजय गगे, अध्यक्ष, संवेदना शैक्षणिक व सामाजिक संस्था.