कडोंमपाच्या 27 गावांची पाणीपुरवठा योजना तत्त्काळ मार्गी लावा - बबनराव लोणीकर
By admin | Published: May 31, 2017 07:09 PM2017-05-31T19:09:19+5:302017-05-31T19:09:19+5:30
पाणी आरक्षणाच्या मुद्यासह, जलकुंभांची जागा तत्काळ निश्चित करून कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 27 गावांची पाणीपुरवठा योजना तत्काळ मार्गी लावावी
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 : पाणी आरक्षणाच्या मुद्यासह, जलकुंभांची जागा तत्काळ निश्चित करून कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 27 गावांची पाणीपुरवठा योजना तत्काळ मार्गी लावावी, अशी सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
लोणीकर यांच्या दालनात कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत नव्याने समावेश झालेल्या 27 गावांच्या पाणीपुरवठा योजनेसह सातारा जिल्ह्यातील खटाव माण, दहिवडी, महिमानगड, शिंगणापूर, खातवळ, औंध गणेशवाडी, पुसेसावळी, वडूज, मायणी या गावांच्या पाणीपुरवठा योजनेबाबत आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील 27 गावांना सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) पाणीपुरवठा होतो , मात्र तो कमी प्रमाणात असल्याने या गावांसाठी पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केली आहे.
तुम्ही नियोजन करा आम्ही पाणी देऊ असे एमआयडीसीतर्फे सांगण्यात आले असल्याची बाब महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत मांडली. दरम्यान, ही महानगरपालिका क्षेत्रातील बाब असून एमआयडीसीतर्फे पाणी देण्यास मंजुरी मिळणे आवश्यक आहे. ती मिळवून अतिरिक्त पाणीपुरवठ़यासाठी प्रस्तावित असलेले जलकुंभ व ते उभरणीसाठी जागा निश्चिती तत्काळ करावी. अशा सूचना यावेळी लोणीकर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पाणी आरक्षणाचा मुद्या असल्याने जलसंपदा विभागासोबत एकत्रित बैठक घेऊन अन्य प्रश्न मार्गी लावण्याचे लोणीकर यांनी सांगितले. भुयारी गटारींची कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
सातारा जिल्ह्यातील मायणी-पाचगाव, वडूज, औंध गणेशवाडी येथील पाणीपुरवठा योजना वीज बिलांच्या थकबाकीमुळे बंद असल्याची बाब अधिकाऱ्यांनी मांडली. यावर 14 व्या वित्त आयोगातून मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी हप्ते पाडून घ्या आणि संबधित गावांचे सरपंच किंवा मुख्याधिकारी, अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावा, अशा सूचना यांनी दिल्या.
तर ठेकेदारांना दंड लावा...
पाणीपुरवठा योजना अधिककाळ रखडत असतील तर ठेकेदारांना दंड लावा, दंड लावून परिणाम होत नसेल तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना सुद्धा लोणीकर यांनी यावेळी दिल्या आहेत.