आठ दिवसांपासून ठाण्यात पाणीबाणी; सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी शुक्रवार उजाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 05:15 AM2020-01-30T05:15:18+5:302020-01-30T05:15:26+5:30
शहराला आजघडीला ४८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे.
ठाणे : योग्य नियोजन केले असले तरी ठाण्यावर मागील आठ दिवसांपासून पाणीसंकट ओढवल्याची बाब समोर आली आहे. जुन्या ठाण्यातील प्रमुख भागांसह घोडबंदर परिसरातही आठ दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. काही भागांमध्ये तर पाण्याचे वेळापत्रकच बिघडले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १३०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला द्रुतगती महामार्गाचे काम सुरू असताना धक्का लागून गळती सुरू झाल्यानेच ही समस्या ओढवल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. तिची दुरुस्ती केल्यानंतर शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असेही स्पष्ट केले आहे.
शहराला आजघडीला ४८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. मागील वर्षी पाऊस चांगला झाल्याने पाणीकपातीचे संकट तूर्तास ओढवलेले नाही. मात्र, असे असले तरी दुरुस्तीसाठी काही महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. असे असतानाच आता आठ दिवसांपासून अनेक भागांना पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. शहरातील नौपाडा, चरई, सिद्धेश्वर टाकीवरून ज्याज्या भागांना पाणीपुरवठा होतो, तेते सर्व भाग तसेच इतर भागांतही पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. परंतु, काही भागांना रात्रीअपरात्री, तर काही भागांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
घोडबंदरवासीयांचे नियोजन कोलमडले
दुसरीकडे घोडबंदर भागातील ब्रह्मांड, वाघबीळ, आझादनगर, पातलीपाडा, डोंगरीपाडा आदी भागांनादेखील या पाणीबाणीचा फटका बसत आहे. रात्रीअपरात्री पाणी येत असल्याने नागरिकांना रात्रीचे जागरण करून ते भरावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे सकाळी कामाला जाण्याचे नियोजनही कोलमडले आहे.
महामार्गाच्या कामामुळे जलवाहिनीला गळती
यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना छेडले असता, मागील आठ दिवसांपासून ही परिस्थिती ठाण्यातील अनेक भागांत असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाºया १३०० मिमी व्यासाच्या पिसे धरणावरून येणाºया जलवाहिनीला रांजनोलीनाक्याजवळ मुख्य द्रुतगती महामार्गाचे काम सुरू असताना धक्का लागून गळती सुरू झाली आहे. ही जलवाहिनी रस्त्याच्या खालून जात असल्याने तिची माहिती तत्काळ समजू शकली नाही. त्यानंतर, डिटेक्टर आणून या जलवाहिनीवर कुठे गळती आहे, याची माहिती घेतली. त्यानुसार, आता तिच्या दुरुस्तीचे काम बुधवारी हाती घेतले आहे. ही दुरुस्ती झाल्यानंतर गुरुवारी कमी दाबाने शहराला पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, शुक्रवारपासून तो सुरळीत होईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.