ठाण्यात आज पाणीपुरवठा राहणार बंद; नागरिकांना पाण्याचा साठा करुन ठेवण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 12:35 PM2022-06-14T12:35:08+5:302022-06-14T12:35:18+5:30
ठाणे : स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲण्ड इन्फ्रा. कं. प्रा. लिमिटेडकडून पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार असल्याने बुधवारी ...
ठाणे : स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲण्ड इन्फ्रा. कं. प्रा. लिमिटेडकडून पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार असल्याने बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील. तसेच समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा व मुंब्रा शहराचा काही भाग येथे बुधवारी रात्री ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील.
दरम्यान, पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे मनपाने केले आहे.