भरपावसात दिवसाआड उल्हासनगरला पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:49 AM2017-08-01T02:49:00+5:302017-08-01T02:49:00+5:30
पाणी वितरण योजनेतील दोषामुळे भर पावसाळयात उल्हासनगरला दिवसाआड पाणीपुरवठा होत असून नागरिकांवर भिजत भिजत बोअरवेल, हातपंपाचे पाणी गोळा करून ते पिण्यासाठी वापरण्याची वेळ आली आहे
उल्हासनगर : पाणी वितरण योजनेतील दोषामुळे भर पावसाळयात उल्हासनगरला दिवसाआड पाणीपुरवठा होत असून नागरिकांवर भिजत भिजत बोअरवेल, हातपंपाचे पाणी गोळा करून ते पिण्यासाठी वापरण्याची वेळ आली आहे. मात्र, पाणी वितरण योजना पूर्ण करण्यासाठी पालिकेने अमृत योजनेअंतर्गत ६० कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची माहिती विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांनी दिली.
मुबलक पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने राबवलेली पाणीवितरण योजना ३०० कोटींवर जाऊनही संपूर्ण शहरात नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या नाहीत. त्यासाठी सिमेंंटचे धडधाकट रस्ते खोदण्यात आले आणि नंतर त्यांच्या दुरूस्तीवर पालिकेने ५० कोटीपेक्षा जास्त खर्च केला. अर्धवट योजनेमुळे भर पावसात दिवसाआड तर काही ठिकाणी आठवडयातून दोनच दिवस पाणीपुरवठा होत आहे.
विधानसभेत पाणीवितरण योजनेचा प्रश्न आमदार ज्योती कलानी यांनी उपस्थित केला. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश वर्षापूर्वी दिले. मात्र चौकशीचे पानही हलले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्याच आदेशाला केराची टोपली दाखवल्याची टीका सुरू आहे.