ठाण्यातील काही भागात गुरूवारी पाणीपुरवठा बंद राहणार!
By अजित मांडके | Published: April 16, 2024 03:49 PM2024-04-16T15:49:33+5:302024-04-16T15:50:34+5:30
पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.
ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, कळवा, माजिवडा, मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेतल्यामुळे गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वा. पर्यंत असा एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद राहील. या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभागसमितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभागसमिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. या कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.