ढोलताशांच्या व्यवसायावर पावसामुळे फिरले पाणी; विसर्जन मिरवणुकांसाठी ऑर्डर नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 12:46 AM2019-09-10T00:46:19+5:302019-09-10T00:46:42+5:30
खान्देशातून आलेल्या पथकांची व्यथा; पूर, आर्थिक मंदीमुळे अनेकांंकडून खर्चात कपात
सचिन सागरे
कल्याण : शेतमजुरी, मोलमजुरी करून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी गणेशोत्सवात दरवर्षी राज्यभरातून ढोलताशांसह वाजंत्री कल्याण-डोंबिवलीत येतात. अनेक गणेशभक्तही आपल्या लाडक्या बाप्पाला ढोलताशांच्या गजरात निरोप देण्यासाठी त्यांना आॅर्डर देतात. मात्र, यंदा पावसाने सर्वच विसर्जनाच्या दिवशी व्यवसायावर पाणी फिरल्याचे वाजंत्रींचे म्हणणे आहे.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गावी शेतात फार काही कामे नसतात. त्यामुळे गणेशोत्सवात ढोलताशा वाजवून चांगली कमाई होईल, या आशेने गणेशोत्सवात दरवर्षी धुळे, जळगाव आणि नाशिक रोड येथून ढोलताशा पथके कल्याण-डोंबिवलीत येतात. यंदाही गणेशोत्सवाच्या आधल्या दिवशीपासून कल्याणमधील सहजानंद चौक, लालचौकी, शिवाजी चौक, अत्रे नाट्य मंदिर परिसर तर डोंबिवलीतील चाररस्ता, इंदिरा गांधी चौक, सम्राट चौक आदी परिसरांत धुळे, जळगाव आणि नाशिक रोड येथून ढोलताशा पथके आली आहेत. या पथकांतील मंडळींनी रस्त्यावरच आपला मुक्काम मांडला आहे. एका पथकात साधारण चार जण ढोलताशा वाजवण्यासाठी जातात. चार हजार रुपयांपासून सुरुवात होऊन माणसागणिक त्यांचा मोबदला वाढत जातो.
कल्याण-डोंबिवलीतील सार्वजनिक मंडळांबरोबर काही हौशी भाविक आपल्या घरगुती गणपतीची ढोलताशा, लेझीम पथक अथवा बॅण्ड पथकांसह भव्यदिव्य विसर्जन मिरवणूक काढतात. मात्र, यंदा गणेशोत्सवात वरुणराजाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे फारशा विसर्जन मिरवणुका निघाल्या नाहीत. त्यामुळे व्यवसायावर पाणी फिरल्याचे काही वाजंत्रींनी ‘लोकमत’ला सांगितले.
मागील वर्षीही गणपतीत पाऊस होता. मात्र, तरीही ग्राहकांकडून वाजंत्रीसाठी ऑर्डर मिळाल्या होत्या. परंतु, यंदा त्याहीपेक्षा कमी व्यवसाय झाला आहे. आर्थिक मंदीमुळेही काहींनी हात आखडता घेतला आहे. काही सार्वजनिक मंडळांनी देखावे, मिरवणुकांवर होणारा खर्च कमी करून पूरग्रस्तांना मदत केली आहे. दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपतीचे विसर्जन तसेच सातव्या दिवशीपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने वाजंत्री ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला मिळाले.
ढोल पथकातील एका व्यक्तीला दिवसभरात २०० रुपये खर्च येतो. त्यामुळे, एखाद्या ग्राहकाने घासाघीस केली तर कमी पैशांतही आॅर्डर स्वीकारली जात आहे. काही नाही त्यापेक्षा किमान जेवण आणि प्रवासाचा खर्च तरी निघेल, असा त्यामागचा आमचा उद्देश आहे. परंतु, परतीच्या प्रवासानंतर हातात केवळ दोन ते तीन हजार रुपयेच उरण्याची शक्यता काही वाजंत्री पथकांतील सदस्यांनी व्यक्त केली.
पारंपरिक वाद्यांना महत्त्व देण्याबरोबरच रुढी-परंपरा जपण्यासाठी आम्ही वाजंत्रींना विसर्जन मिरवणुकीत आम्ही आणत असतो. मात्र, यंदा महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती पाहता अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, या हेतूने कोणत्याही प्रकारचे वाद्य ठेवले नाही.
- शेखर पवार, गणेशभक्त
राहण्याचेही मोठे हाल
नाशिक, जळगाव, धुळे येथून आलेल्या वाजंत्रींची येथे राहण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे ते दुकानाबाहेर अथवा रस्त्यावरच मुक्काम ठोकतात. परंतु, यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वच ठिकाणी ओले असल्याने राहण्याचे मोठे हाल झाल्याचे काहींनी सांगितले.
गणपतीच्या वेळी आम्ही शहरात येतो. परंतु, यंदाच्या वर्षी पाऊस पडत असल्याने अद्याप म्हणावी तशी कमाई झाली नाही. केवळ माणसांच्या खाण्यापिण्याचा खर्चच भागत आहे. - चेतन धोंगडे, साईनाथ ढोलवाले, नाशिक रोड
तासाला आम्ही साधारणपणे तीन ते चार हजार रुपये घेतो. मात्र, यंदाच्या पावसामुळे ते पैसेही मिळणे मुश्कील झाले आहे. - सतीश, दीपक ढोलवाले