कल्याण-डाेंबवलीच्या माजी उपमहापौरांच्या घरी टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:39 AM2021-04-15T04:39:13+5:302021-04-15T04:39:13+5:30

कल्याण : २७ गावांत पाणीटंचाईची समस्या नागरिकांना भेडसावत असताना त्याची झळ भाजपचे माजी नगरसेवक व उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनाही ...

Water by tanker at the house of former Deputy Mayor of Kalyan-Dambwali | कल्याण-डाेंबवलीच्या माजी उपमहापौरांच्या घरी टँकरने पाणी

कल्याण-डाेंबवलीच्या माजी उपमहापौरांच्या घरी टँकरने पाणी

Next

कल्याण : २७ गावांत पाणीटंचाईची समस्या नागरिकांना भेडसावत असताना त्याची झळ भाजपचे माजी नगरसेवक व उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनाही बसली आहे. कल्याण-शीळ रस्त्यालगत असलेल्या पिसवली गावात राहणारे भाजपचे भोईर यांना चक्क टँकरने पाणी मागवण्याची वेळ आली आहे. या पाणीटंचाईकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. अन्यथा, पाणीटंचाईमुळे २७ गावांतील नागरिक होरपळू निघतील याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

भोईर हे पिसवली परिसरात राहतात. त्यांच्या घरी पाणी नसल्याने त्यांनी १२०० रुपयांना खासगी टँकर मागविला. एक टँकरचे पाणी त्यांना आठवडाभर पुरवून वापरण्याची वेळ आली आहे. महापालिकाही टंचाईग्रस्त भागाला माफक दरात टँकरने पाणीपुरवठा करते. एका टँकरच्या फेरीला पालिकेकडून ४५० रुपये आकारले जातात. २७ गावांत पाण्याची समस्या केवळ पिसवली परिसराला भेडसावत नसून सगळ्या भागाला भेडसावत आहे. मागच्या आठवड्यात भाजपच्या माजी नगरसेविका सुनीता पाटील यांनी पाणीटंचाईविरोधात आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यांनी एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयात धाव घेतली होती. त्या ठिकाणी आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी पाणीटंचाई दूर करण्याचे आश्वासन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. प्रत्यक्षात आठवडा उलटून गेला तरी परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही. एमआयडीसीकडून २७ गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्याचे पाणीबिल महापालिका भरते. एमआयडीसीकडून केला जाणारा पाणीपुरवठा हा १.५ किलो दाबाने केला जात होता. आता हा दाब कमी करून तो ०.८० किलोवर आणला आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याने पाणी कमी येत आहे. त्यामुळे पाण्याचा दाब वाढविण्यात यावा, अशी मागणी भोईर यांनी केली आहे़

टँकरवाल्यांची चलती

२७ गावांतील अनेक सोसायट्या आणि बंगलोवजा घरे खासगी टँकरद्वारे पाणी मागवून तहान भागवित आहेत. त्यामुळे टँकरवाल्यांची चलती आहे. महापालिकेच्या अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या कामाला गती देण्याची गरज असल्याचे भोईर यांनी सांगितले.

फोटो-कल्याण-टँकरने पाणीपुरवठा

--------------

Web Title: Water by tanker at the house of former Deputy Mayor of Kalyan-Dambwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.