बिल्डरांसाठी पाण्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:47 AM2019-04-13T00:47:56+5:302019-04-13T00:48:16+5:30
प्रशासनाला अपयश : उल्हास नदी परिसरात टँकरलॉबी सक्रिय, नागरिकांना टंचाईची झळ
बदलापूर : बदलापूरमध्ये पाणीटंचाईमुळे अनेक सोसायट्या या टँकरवरच अवलंबून आहेत. पिण्याच्या पाण्यावर टँकरलॉबी सक्रिय असतानाच आता बांधकाम व्यवसायाला पाणीपुरवठा करण्यातही टँकरलॉबी कमी पडलेली नाही. शहरातील अनेक टँकरचालक उल्हास नदीतून दिवसरात्र पाणी चोरून त्याची चढ्या दराने विक्री करत आहेत. उल्हास नदीतून होणारी पाणीचोरी रोखण्यात स्थानिक प्रशासन आणि लघुपाटबंधारे विभागाला अपयश आले आहे.
बदलापूर शहरात पाण्याचा व्यापार जास्तच तेजीत आला आहे. पिण्याच्या पाण्यासोबत आता बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरही निर्बंध आणण्याची वेळ बदलापुरात आली आहे. बांधकामासाठी जो पाणीपुरवठा केला जात आहे, ते पाणी थेट उल्हास नदीतून उचलण्यात येत आहे. उल्हास नदीवरील पाण्याचे आरक्षण हे प्रत्येक शहरासाठी निश्चित केले आहे. मात्र, असे असतानाही मोठ्या प्रमाणात पाणी नदीतून उचलण्यात येत आहे. शहरांना दिलेल्या पाण्याच्या आरक्षणापेक्षा जास्तीचे पाणी उचलल्यास त्या शहरांवर कारवाईचा आदेश पाटबंधारे विभागाने दिला आहे.
मात्र, शहरांसाठी उचलण्यात येणारे पाणी हे निश्चित प्रमाणातच उचलणे गरजेचे असताना शहरांत इतर ठिकाणी चोरून मोठ्या प्रमाणात पाणी उचलण्यात येत आहे. उल्हास नदीच्या पात्रातून रोज शंभरहून अधिक टँकर पाणी चोरून घेतात. त्यासाठी कुणाची परवानगीही घेतली जात नाही किंवा चोरणाऱ्यांना कुणाकडे पैसेही भरावे लागत नाही. जे काही आहे, ते पोलिसांना सोबत घेऊन सर्रासपणे सुरू आहे. पाण्याची चोरी ही पोलिसांसमोर होत असतानाही ते कोणतीच कारवाई करत नाहीत. तर, ज्या प्रशासनाकडे याची जबाबदारी आहे, तेही यासंदर्भात कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही.
बदलापूर शहरातून वाहणाºया उल्हास नदीपात्रातून पाणीचोरी करण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे बदलापूर गावाकडील उल्हास नदीवरील पूल. या पुलाखालून नदीपात्रात जाणे शक्य असल्याने या पात्रातून दररोज पाण्याची चोरी केली जाते. या ठिकाणी जाण्याचा मार्ग बंद करणे सहज शक्य असतानाही त्यासंदर्भात कोणतीच कारवाई केली जात नाही.
एक ते दोन हजारांत टँकरची विक्री पाणीचोरांचा वाढत आहे दबदबा
पोलिसांना हाताशी धरून हा व्यवसाय सुरू असल्याने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ही पाणीचोरी सुरू आहे. यावर निर्बंध घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे. उल्हास नदीतील पाणी थेट बांधकाम व्यावसायिकांना एक ते दोन हजारांत विकले जाते.
उलट, टँकरमाफियांना स्वातंत्र्य देण्याचे कामच केले जात आहे. ठरलेल्या टँकरव्यतिरिक्त शहरातील दुसरा कोणताही टँकर या ठिकाणी पाणी भरण्यासाठी आल्यावर त्याला रोखण्याचे काम केले जाते. यावरून, हे स्पष्ट होत आहे की, पाणी चोरणाºया टँकरमालकांचा दबदबा हा किती वाढला आहे.