बदलापुरात उल्हास नदीतून पाणीचोरी सुरुच, चिखलोली धरणातूनही पाणी चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:30 AM2019-05-11T00:30:48+5:302019-05-11T00:34:45+5:30
अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणीटंचाई असताना ज्या नदी तसेच धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणातून आणि नदीतून पाणी चोरीचे प्रकार घडत आहेत.
- पंकज पाटील
अंबरनाथ/बदलापूर - अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणीटंचाई असताना ज्या नदी तसेच धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणातून आणि नदीतून पाणी चोरीचे प्रकार घडत आहेत. उल्हास नदीतून पाणी चोरी करणाऱ्या टँकरची संख्या दिवसागणिक वाढते आहे. तर चिखलोली धरणाच्या पात्रात जाऊन काही टँकर चालक पाणीचोरी करत आहेत. या दोन्ही पाणी चोरीकडे लघुपाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना उल्हास नदी आणि चिखलोली धरणातून पाणी पुरवठा होतो. चिखलोली धरणाने तळ गाठल्याने ते पाणी न वापरता त्याच्या मोबदल्यात एमआयडीसीकडून पाणी घेतले जात आहे. तरीही या चिखलोली धरणातील पाण्यावर डल्ला मारण्याचे काम काही टँकर मालक करताना दिसत आहेत. चिखलोली धरणाच्या पायथ्याशी वाहून येणारे पाणी एका डबक्यात साठवून ते पाणी काही टँकर चालक उचलत आहेत.
तर काही टँकर चालकांनी थेट चिखलोली धरणाच्या पात्रातच टँकर उभे करून दिवसाढवळ्या पाणी चोरी सुरू केली आहे. धरणाच्या पात्रात जाण्यास बंदी असतानाही थेट टँकरच या पात्रात जात आहेत. टँकर मालकांची ही दादागिरी असल्याने त्यांना या ठिकाणी कोणीच रोखत नाहीत. एमआयडीसीमार्गे हे टँकर चालक थेट धरण पात्रात उतरतात. तेथे पंप लावून पाणी उचलण्याचे काम करत आहेत. दिवसाला ६० ते ७० टँकर भरुन शहरात नेले जात आहे. त्या पाण्याची विक्री १००० ते २००० रुपयांपर्यंत केले जात आहे. दररोज टँकर चालक पाण्याची चोरी करत असतानाही त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे येत नाहीत.
दुसरीकडे उल्हास नदीतही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. उल्हास नदीच्या पात्रात बदलापूर गावाजवळील पुलाखाली अनेक टँकर दररोज १०० हुन अधिक टँकर भरुन नेत आहेत. काही भागात पाणी टंचाई असल्याने हे टँकर त्या ठिकाणी पुरविण्यात येत आहेत. एकावेळी १० ते १२ टँकर उल्हास नदीत पाणी भरत असतात. दिवसा हा प्रकार घडत असतांनाही त्यांना रोखण्याचे काम केले जात नाही. गेल्या आठवड्याभरात नदीतुन पाणी भरणाºया टँकरची संख्या वाढल्याने टँकर लॉबी ही मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे.
लघुपाटबंधारे विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेणे शक्य होत नाही. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे लघुबाटबंधारे विभागाकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.