उल्हास नदीचे पाणी उगमस्थानी आजही निर्मळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:37 AM2019-12-19T00:37:25+5:302019-12-19T00:37:30+5:30

कृती समितीने केला दोन दिवसांचा पाहणी दौरा : कर्जत ते कल्याण या प्रवासात प्रदूषण

The water of the Ulhas River is still clear at the source | उल्हास नदीचे पाणी उगमस्थानी आजही निर्मळच

उल्हास नदीचे पाणी उगमस्थानी आजही निर्मळच

Next

मुरलीधर भवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : लाखो लोकांची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीच्या प्रदूषणाचा शोध घेण्यासाठी ‘उल्हास नदी बचाव कृती समिती’ने दोन दिवस नदीच्या उगमापासून कल्याणच्या रायता गावापर्यंत दौरा करून नदीच्या प्रदूषित पाण्याचे नमुने गोळा केले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवून त्याचे अहवाल उच्च न्यायालयात सादर केले जाणार आहेत. राजमाची येथे उल्हास नदीचा उगम होतो. तेथील पाणी आजही स्वच्छ व पिण्यायोग्य आहे. मात्र, कर्जतपासून कल्याणपर्यंत येताना ते प्रदूषित झालेले आहे. त्यामुळे नदीच्या प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या दाव्याला आव्हान दिले जाणार आहे.
उल्हास नदी बचाव कृती समितीचे रवींद्र लिंगायत, अश्वीन भोईर, विवेक गंभीरराव, प्रवीण नागरे, निकेत व्यवहारे, निकेश पावशे, अशफाक शेख, योगेश पवार, हर्षल भोईर, बंटी म्हसकर, मुकुंद भागवत, समीर सोहानी, केशव तरे, राजेंद्र अभंग, प्रशांत राऊत, स्वप्नील म्हात्रे, रंजन झा यांच्यासह वकील रवींद्र केदार, विलास शिरोशे यांनी १४ व १५ डिसेंबर रोजी हा दौरा केला. या अभ्यास दौºयासाठी सागर सुर्वे व सुधाकर झोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
कोंढाणे लेण्यांच्या बाजूला असलेल्या गावात सात किलोमीटर आत राजमाची व खंडाळा येथून वाहत येणाºया नदीच्या संगमाजवळ उल्हास नदी अभ्यास दौºयाची सुरुवात झाली. उल्हास नदीच्या किनाºयाने सुरू झालेला हा प्रवास कर्जतपर्यंत झाला. त्यानंतर, नेरळला एक रात्रीचा थांबा होता. त्यानंतर, पुन्हा नेरळ, भिवपुरी, शेलू, वांगणी, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण खाडी असा प्रवास करण्यात आला. दर १० किलोमीटरच्या अंतरावर नदीच्या प्रवाही पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. नदीच्या उगमाजवळ पाणी इतके स्वच्छ आहे की, ते पिण्याजोगे आहे. कर्जतपासून नदी प्रदूषित होत जाते. तो तिचा प्रदूषणाचा प्रवास कल्याण खाडीपर्यंत सुरूच राहतो. नदीच्या किनारी असलेल्या वृक्षसंपदेच्या नोंदी अभ्यास दौºयात कार्यकर्त्यांनी घेतल्या. प्रदूषणामुळे नदीतील मासेमारी बंद होत चालली आहे. कर्जतमध्ये एका हॉटेलमालकाने नदीपात्रात अतिक्रमण करून ड्रेनेजचे पाणी सोडले आहे. नदीकाठच्या गावांनी तर नदीचे किनारे हे डम्पिंग ग्राउंड करून टाकले आहेत. या सगळ्याचा अहवाल व पर्यावरणीय प्रयोगशाळेतील अहवाल उच्च न्यायालयात सादर करून प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळास आवाहन केले जाणार आहे.
‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेच्या वतीने ‘सेव्ह उल्हास रिव्हर’ प्रकल्पांतर्गत नदी प्रदूषण रोखण्यासाठी हरित लवादाकडे २०१३ मध्ये दाखल केलेली याचिका न्यायप्रविष्ट आहे. उल्हास नदी प्रदूषणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातही न्यायप्रविष्ट आहे. उल्हास नदीचा शास्त्रोक्त अभ्यास कल्याण येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राद्वारे केला जावा, अशी मागणी समितीने यापूर्वीच केली आहे.
पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर यांनी अलीकडेच डोंबिवलीतील एका कार्यक्रमात प्रदूषणाची समस्या दिल्लीपासून डोंबिवलीपर्यंत आहे, याकडे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर पोल्युशन कंट्रोल बोर्ड नसून पॉलिटीकल कंट्रोल बोर्ड अशी टीकाही केली होती. समितीनेही नदी प्रदूषण रोखण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरले आहे, असे नमूद केले आहे. त्यामुळेच मंडळाच्या दाव्याला उच्च न्यायालयात प्रदूषणाच्या पुराव्यासह आव्हान दिले जाणार असून प्रदूषण सप्रमाण सिद्ध केले जाणार आहे.
उल्हास नदी बचाव कृती समितीने यापूर्वी उल्हास नदी प्रदूषणाचा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे. उल्हास नदी बचावसाठी विविध ठिकाणच्या संस्था कार्यरत आहेत. त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एकाच व्यासपीठावर काम करावे, असे आवाहन समितीने केले आहे.

Web Title: The water of the Ulhas River is still clear at the source

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.