नांदीवलीत पाणी तुंबू नये यासाठी पंपाद्वारे पाणी नाल्यात सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:06+5:302021-06-18T04:28:06+5:30
डोंबिवली : नांदीवलीच्या समर्थनगरमध्ये पावसाच्या दिवसांत पाणी साचू नये, नागरिकांच्या घरांसह वाहनांचे नुकसान होऊ नये, यासाठी तीन मोटरपंपांच्या साहाय्याने ...
डोंबिवली : नांदीवलीच्या समर्थनगरमध्ये पावसाच्या दिवसांत पाणी साचू नये, नागरिकांच्या घरांसह वाहनांचे नुकसान होऊ नये, यासाठी तीन मोटरपंपांच्या साहाय्याने ते पाणी नाल्यात सोडण्याचा पर्याय महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने तयार केला आहे. त्यानुसार तातडीने कार्यवाही करून पाणी उपसा करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत.
आमदार राजू पाटील यांनी तेथील रहिवाशांच्या तक्रारी आल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. आठवडाभरात उपाययोजना करून अंमलबजावणी करण्याचेही त्यांनी सुचविले होते. त्यानुसार मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद मतगुंडी यांनी अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. त्यात स्वामी समर्थ महाराजांच्या मठामागील भागातून नाल्याकडे नेमकी किती जागा आहे, याबाबतचीही पाहणी केली. त्यानुसार आजूबाजूच्या इमारतींच्या आवारातून रस्त्यावरून मोठे प्लास्टिक पाईप टाकून नाल्यापर्यंत नेणे, तसेच जेथे पाणी साचते त्या भागात पंप लावणे असा पर्याय समोर आल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार तीन पंपांपैकी दोन इलेक्ट्रिक पंप आणि एक डिझेल पंप असेल, असा प्रस्ताव आहे. त्यासाठी सुमारे १४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. हा खर्च आपत्कालीन निधीतून करण्यात येणार असून त्या भागात रस्ते, गटार या संदर्भातील प्रस्तावित फाईल, त्याबाबतच्या निधीची तरतूद ही कामे सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.