ठाण्यात १४ ठिकाणी तुंबणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:40 AM2021-05-23T04:40:23+5:302021-05-23T04:40:23+5:30
ठाणे : मान्सूनपूर्व झालेल्या पावसाने ठाणे महापालिकेच्या शहरातील पुन्हा त्याच सखल भागात पाणी साचल्याची माहिती समोर आली आहे. ...
ठाणे : मान्सूनपूर्व झालेल्या पावसाने ठाणे महापालिकेच्या शहरातील पुन्हा त्याच सखल भागात पाणी साचल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी महापालिकेने काय काय तयारी केली आहे, याचा अंदाज बांधता येणार आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी शहरातील सखल भागात पाणी साचू नये म्हणून विविध उपाययोजना केल्या जातात. परंतु, तरीदेखील त्याच सखल भागात पाणी साचत असल्याने महापालिकेच्या या उपाययोजना केवळ कागदावरच राहिल्याचे दिसत आहे, तर यंदा आता शहरातील १४ सखल भागांमध्ये पाणी साचणार असल्याचे महापालिकेने आधीच स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिका आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. परंतु, पावसाळ्यापूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने ठाणे महापालिकेची यंत्रणा किती सज्ज आहे, याची पोलखोल केली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळ आणि पावसाने शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर शहरातील अनेक सखल भागात पाणीच पाणी असे चित्र होते. त्यामुळे महापालिकेने कशा उपाययोजना आखल्या आहेत, हे यावरून स्पष्ट झाले.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेच्या माध्यमातून दरवर्षी सखल भागांची यादी तयार करण्यात येत आहे. मागील वर्षी शहरात २४ अशी ठिकाणे होती, जिथे पाणी साचणार होते. यंदा ही संख्या १४ वर आली आहे; परंतु असे असले तरी पावसाळ्यात हा आकडादेखील वाढताना दिसत असतो. अनेक ठिकाणी नाल्यांचे प्रवाह बदलण्यात आल्याने, काही ठिकाणी नाल्यांचा गाळ वेळेत काढला न गेल्याने किंवा रस्त्यांचे आकारमान वर-खाली केल्याने शहरातील सखल भागांची यादी वाढताना दिसत आहे. त्यामुळेच अशा सखल भागात पाणी साचताना दिसते. याचाच परिणाम पूर्वीच्या काही सखल भागांऐवजी नव्या भागांचा यात समावेश होताना दिसून आला आहे.
यंदाच्या मान्सूनमध्ये शहरातील राम मारुती रोड, गोखले रोड, राम गणेश गडकरी रंगायतन, सॅटिस पुलाखालील भाग, मासुंदा तलाव, वंदना सिनेमा परिसर आदी ठिकाणी पाणी साठू शकते तर प्रभाग समितीनिहाय विचार करता सर्वाधिक पाणी साठण्याची ठिकाणे नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत आठ आहेत, तर त्यापाठोपाठ उथळसर - २, माजिवडा-मानपाडा -२, कळवा -१, मुंब्रा -१ अशी ठिकाणे आहेत.
पाणी साठण्याची ठिकाणे -
डेबोनेर सोसायटी, वंदना टॉकीज, गजानन महाराज चौक, गडकरी चौक, देवधर रुग्णालय, जिजामाता मंडई, पंपिंग स्टेशन, चव्हाण चाळ, वृदांवन आणि श्रीरंग सोसायटी, पंचामृत, आयसीआयसीआय बँक घोडबंदर रोड, विटावा सबवे आणि दिवा गाव यांचा समावेश आहे.