निवडणूक संपताच पाणीकपात सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 01:29 AM2019-05-02T01:29:48+5:302019-05-02T01:30:03+5:30
गरज सरो अन् वैद्य मरो : सत्ताधाऱ्यांविरोधात ठाणेकरांमध्ये संताप
ठाणे : निवडणुकीची धामधूम संपताच ठाण्यातील पाणीकपात बुधवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या काळात ठाणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू नये किंवा त्यामुळे आपल्या मतांवर परिणाम होऊ नये, म्हणून सत्ताधाऱ्यांनी शहराची पाणीकपात मागील १५ दिवस बंद केली होती. परंतु, आता मतदान झाल्यानंतर बुधवारपासून पुन्हा २४ तासांची पाणीकपात सुरू झाली आहे. सत्ताधाºयांच्या ‘गरज सरो, अन् वैद्य मरो’ या धोरणाविरोधात आता ठाणेकरांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांवर आरोप करून पाणी समस्येला वाचा फोडली होती. त्यानंतर, अचानक पाणीकपात रद्द करण्यात आली. लोकसभा निवडणुकीदरम्यान मागील १५ दिवस बहुतेक भागांत पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता. परंतु, मतदान झाले आणि पाणीकपात तेवढ्याच दमाने पुन्हा सुरू झाली. त्यात आज बुधवार असल्याने नियमानुसार पाणीकपात करत असल्याची माहिती महापालिकेने दिली. ती २४ तासांची राहणार असल्याचेही स्पष्ट केले.
पाणी कपातीमुळे मतदारांची नाराजी ओढवून घेणे सत्ताधाऱ्यांना महागात पडले असते, म्हणूनच की काय, ही कपात निवडणुकीपुरती रद्द करण्यात आली होती, असे बोलले जात आहे. असे असले तरी कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील भागांत मात्र ती निवडणूक काळातही पाणीकपात सुरूच होती. इंदिरानगर, रूपादेवीपाडा या भागांनाही आजही पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. परंतु, हा प्रश्न सोडवण्याऐवजी किंवा त्यावर भाष्य करण्याऐवजी राजकीय मंडळी मात्र या पाण्यावरच आपल्या मतांची पोळी भाजून घेताना दिसते.