जलकुंभ बनले गर्दुल्ले, नशेखोरांचे अड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 10:58 PM2019-11-16T22:58:07+5:302019-11-16T22:58:13+5:30
उल्हासनगर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : बंद पडलेले जलकुंभ सुरू करण्याची मागणी
उल्हासनगर : पाणीपुरवठ्याचे वितरण समसमान होण्यासाठी जलकुंभ उभारण्यात आले. त्यापैकी काही जलकुंभ अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत. त्या जागेचा वापर गर्दुल्ले, नशाखोर, भुरटे चोर करत आहेत. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मनसेचे शहर संघटक मैन्नुद्दीन शेख यांनी याबाबत निवेदन देत पालिकेचे लक्ष वेधले आहे. उल्हासनगरात ३०० कोटींच्या पाणीपुरवठा वितरण योजनेंतर्गत संपूर्ण शहरात नवीन जलवाहिनी, उंच आणि भूमिगत जलकुुंभ, पंपिंग स्टेशन बांधण्यात आले. त्यापैकी कॅम्प नं. १ व ५ येथील टिळकनगर आणि प्रेमनगर टेकडी येथील जलकुंभ १० वर्षांपासून वापराविना पडून आहेत. जलकुंभ बांधण्यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. वापराविना असलेल्या जलकुंभप्रकरणी ठेकेदारावर महापालिकेने कारवाई का केली नाही, असा प्रश्न मनसेचे शहर संघटक मैन्नुद्दीन शेख यांनी उपस्थित केला. जलकुंभाशेजारील जागेचा ताबा गर्दुल्ले, नशेखोर, भुरटेचोर आदींनी घेतला आहे. गेल्याच आठवड्यात कॅम्प नं. ४, कुर्ला कॅम्प, सुभाष टेकडी येथील जलकुंभाखाली गोळीबार होऊ न एका तरुणाचा बळी गेला आहे. तसाच प्रकार इतर ठिकाणी होण्याची शक्यता शेख यांनी व्यक्त करून तसे पत्र महापालिकेला दिले.
महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे यांनी जलकुंभ वापराविना पडून असल्याचे मान्य केले. तसेच जलकुंभाची क्षमता तपासून वापरण्यास सुरुवात करण्याचे संकेत दिले. जलकुंभावर रात्रीपाळीवर सुरक्षारक्षकांची नेमणूक केल्यास गर्दुल्ले, नशेखोर आणि भुरट्या चोरांवर वचक बसणार असल्याचे मैन्नुद्दीन शेख यांनी सांगितले. जलकुंभ सुरक्षित राहणार असल्याचे शेख म्हणाले. टिळकनगर येथील जलकुंभ परिसरात समाजमंदिरांचे भूमिपूजन दोनदा होऊ नही काम पूर्ण झाले नसल्याचा प्रकारही त्यांनी उघड केला. महापालिकेचे समाजमंदिर, पम्पिंग स्टेशन जागा, जलकुंभ आणि खुल्या जागा, उद्याने, शौचालय, मैदाने आदी परिसरांत भुरटेचोर, नशेखोर, गर्दुल्ले आदींचा वावर वाढल्याचे काही घटनांवरून उघड झाले आहे.
जलकुंभाची सुरक्षा धोक्यात
महापालिका जलकुंभ, उद्याने सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे जलकुंभाची सुरक्षाच धोक्यात आली आहे. याठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मध्यंतरी, काही जलकुंभांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. सद्य:स्थितीत हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.