माळशेज घाट परिसरात पाणीबाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:24 AM2018-04-05T06:24:03+5:302018-04-05T06:24:03+5:30
तालुक्यातील माळशेजघाट परिसरातील दुर्गम आदिवासी भागात भीषण पाणीटंचाई सुरू झाली असून जमिनीत खड्डे खोदून तीन किमी अंतरावरून डोक्यावरून पाणी आणावे लागते आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत या दुर्गम भागात पाण्याचे दुर्भिक्ष नेहमीच जाणवते.
मुरबाड - तालुक्यातील माळशेजघाट परिसरातील दुर्गम आदिवासी भागात भीषण पाणीटंचाई सुरू झाली असून जमिनीत खड्डे खोदून तीन किमी अंतरावरून डोक्यावरून पाणी आणावे लागते आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत या दुर्गम भागात पाण्याचे दुर्भिक्ष नेहमीच जाणवते. मात्र, एप्रिल नुकताच सुरू झाला आहे, तरीही खेड्यापाड्यांत ही परिस्थिती दिसते आहे.
मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या बाजूचा परिसर हा डोंगराळ, अतिदुर्गमअसून या परिसरात बहुतांश आदिवासी समाज राहतो. गावपाड्यांतील विहिरी, तलाव आटले असून उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने जवळपासच्या पाणवठ्याची ठिकाणे कोरडीठाक झाली आहेत. त्यामुळे आदिवासींना पाण्यासाठी दोन ते तीन किमी अंतरावर डोंगरदऱ्या चढउतार करून जमिनीत खड्डे खोदून त्यातील पाणी भांड्यामधून आणावे लागते आहे. पाणी आणण्यातच या आदिवासींचा अर्धा दिवस जात आहे. खड्डे खोदून आणलेले हे पाणी अशुद्ध असते. मात्र, पाणी शुद्धीकरण यंत्रणेअभावी त्यांना तसेच पाणी प्यावे लागते आहे. पाणीटंचाई भीषण असल्याने या आदिवासींना तीनतीन दिवस अंघोळही करता येत नाही.
शासनाच्या स्वच्छता अभियानाचेही तीनतेरा वाजले आहेत. पाणीटंचाईमुळे बहुतांश आदिवासींनी शौचालयाचा वापरदेखील बंद केला आहे. पिण्यासाठीच पाणी नाही, तर शौचालयासाठी पाणी कोठून आणणार, असा सवाल हे आदिवासी करत आहेत. आदिवासी दुर्गम भागातील कुंभाळा, धारखिंड, केळेवाडी, मोधळवाडी, शिसेवाडी, डोंगरवाडी, करपटवाडी, पायरवाडी, आल्याचीवाडी आदी परिसरांत भीषण पाणीटंचाई आहे. पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागत असल्याने आणि अर्धा दिवस त्यातच जात असल्याने रोजगारासाठी वेळ मिळत नाही. तसेच अर्धा दिवस रोजगार मजुरी केल्याने मिळालेल्या उत्पन्नात कुटुंबाचा गाडा कसा चालवणार, या विवंचनेत सध्या हे आदिवासी आहेत. आदिवासींची उपासमार होत असल्याने त्यांनी घाटमाथ्यावर स्थलांतर केले आहे.
लोकप्रतिनिधींना साकडे
भीषण पाणीटंचाई सुरू झाल्याने ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी तातडीने या परिसरात जाऊन पाहणी केली. बºयाच पाणीपुरवठा योजनांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने या योजना बंद आहेत. त्यामुळे विद्युतपुरवठा सुरू करून पाणीपुरवठादेखील लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आदिवासींनी पवार यांना साकडे घातले. पवार यांनीदेखील विद्युतपुरवठा सुरू करण्यासोबतच पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.
ज्या ग्रामपंचायतींनी पाण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहे, त्यांना तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत.
-सचिन चौधर, तहसीलदार, मुरबाड